सातारा : पक्षकारांनी त्यांची इर्षा व अहंभाव बाजूला ठेऊन पुढाकार घ्यावा आणि मध्यस्थी मार्फत आपले तंटे व वाद सामोपचाराने मध्यस्थी केंद्रामार्फत किंवा लोक न्यायालयाच्या माध्यमातून मिटवावेत, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.एम. गव्हाणे यांनी आज केले.
सातारा जिल्हा मध्यस्थी केंद्र व वकील संघाच्या संयुक्त विद्यमाने मध्यस्थी जनजागृती अभियान कार्यक्रम जिल्हा व सत्र न्यायालयातील रामशास्त्री प्रुभणे सभागृहात आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी अध्यक्षीय भाषणात प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. एस.एम. गव्हाणे बोलत होते. कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वलन करुन करण्यात आली. याप्रसंगी जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. डब्ल्यू. देशपांडे, जिल्हा मध्यस्थ केंद्राच्या समन्वयक डॉ. अनिता नेवसे, वकील संघाचे अध्यक्ष अजय डांगे आदी यावेळी उपस्थित होते.
मध्यस्थी केंद्रामार्फत मिटविण्यात येणारे खटले हे घटनेने दिलेल्या तत्वानुसार मिटविले जातात, असे सांगून श्री. गव्हाणे पुढे म्हणाले, मध्यस्थी केंद्रामार्फत दोन्ही बाजुंचे म्हणणे एकूण दोघांना समान न्याय दिला जातो. जिल्हा विधी सेवाकेंद्रामार्फत पक्षकारांसाठी असे अनेक विविध उपक्रम राबविण्यात येतात. मध्यस्थी केंद्रामार्फत आपले तंटे व वाद सामोपचाराने सोडवल्यास वेळेचा व पैशाचा अपव्यय टळेल. मध्यस्थी करु इच्छिणाऱ्या पक्षकारांसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून सर्व ती मदत केली जाईल, असे आश्वासनही त्यांनी शेवटी दिले.
यावेळी जिल्हा मध्यस्थ केंद्राच्या समन्वयक डॉ. अनिता नेवसे म्हणाल्या, प्रलंबीत खटल्यांचे प्रमाण पाहता मध्यस्थी ही काळाची गरज बनली आहे, यामुळेच मध्यस्थी जनजागृती अभियानाचे वर्षातून दोन वेळा आयोजन केले जाते. मध्यस्थी केंद्राच्या माध्यमातून दोन्ही बाजुंचे म्हणणे ऐकून त्यांना समाधानकरक न्याय देण्यात येतो. जानेवारी 2015 ते 31 ऑगस्ट 2015 पर्यंत 530 प्रकरणे मध्यस्थी केंद्राच्या माध्यमातून मिटविण्यात आली आहेत हे या मध्यस्थी केंद्राचे यश आहे.
न्यायाधीशांनी निर्णय क्षमता वाढविली असली तरी आजच्या खटल्यांमध्ये गुंतागुंतीचे प्रमाण वाढले असून खटले जास्त प्रमाणात प्रलंबित राहत आहेत त्यामुळे मध्यस्थी महत्वाची आहे. तरी पक्षकारांनी या मध्यस्थी केंद्राचा जास्तीत जास्त लाभ घेऊन आपले खटले निकाली काढावेत, असे आवाहनही डॉ. अनिता नेवसे यांनी यावेळी केले.
या मध्यस्थी जनजागृती अभियानात जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष वकील अजय डांगे हे मध्यस्थ केंद्राची कार्यपद्धती व अनुभव यावर, जिल्हा वकील संघाचे सदस्य वकील एन.एम. वाडीकर मध्यस्थीकरिता संदर्भीत करण्यात येणारी प्रकरणे व त्याची पद्धती यावर, तज्ज्ञ विधीज्ञ वकील एस.बी. गोवेकर यांनी तज्ज्ञ मध्यस्थ, विधीज्ञ व पक्षकार यांची भूमिका यावर, सहदिवाणी न्यायाधीश कनिष्ठस्तर जी.एम. नदाफ यांनी मध्यस्थ, एक प्रक्रिया, एक गरज व फायदे या विषयांवर उपस्थितांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन ऍ़ड. सोनाली औंधकर यांनी केले तर आभार प्रदर्शन सहदिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर एस.बी. पाटील यांनी केले. या कार्यक्रमास न्यायाधीश, निवृत्त न्यायाधीश डी. के. राजेपांढरे, वकील, विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थींनी, पक्षकार मोठया संख्येने उपस्थित होते.