पुणे, : महावितरणच्या त्रिसुत्री एकदिवसीय कार्यक्रमात मंचर विभागातील पाच ग्रामपंचायतींमध्ये वीजयंत्रणेच्या दुरुस्ती व वीजसेवेबाबत विविध 890 कामे गुरुवारी (दि. 3) पूर्ण करण्यात आली.
मंचर विभागातील खडकवाडी (मंचर), कुरवंडी (घोडेगाव), मांजरवाडी (नारायणगाव), खानगाव (जुन्नर) व बल्लाळवाडी (आळेफाटा उपविभाग) या ग्रामपंचायतींमध्ये त्रिसुत्री एकदिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते व या ग्रामपंचायतींमध्ये एकाच दिवशी 890 वीजविषयक विविध कामे करण्यात आली. यात 389 ठिकाणी वीजयंत्रणेच्या दुरुस्तीमध्ये वाकलेले वीजखांब सरळ करणे, डिस्ट्रीब्यूशन बॉक्स व किटकॅट बदलणे, रोहित्र देखभाल, नवीन वीजखांब, तारांमधील झोल काढणे, वीजखांबाला रंगकाम, स्पेसर्स बसविणे, झाडाच्या फांद्या तोडणे आदी कामांचा समावेश आहे. वीजसेवेमध्ये वीजदेयकांची दुरुस्ती, रिडींग घेणे, मीटर बदलणे आदी 462 कामे करण्यात आली तर 39 ठिकाणी नवीन वीजजोडणी देण्यात आली आहे. या पाच ग्रामपंचायतींमध्ये ‘त्रिसुत्री’मधील कामांच्या अंमलबजावणीसाठी मंचर विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. प्रकाश खांडेकर तसेच 224 अभियंते, कर्मचारी सहभागी झाले होते.
महावितरणच्या त्रिसुत्री कार्यक्रमाचे येत्या गुरुवारी (दि. 10) गावडेवाडी (मंचर), गंगापूर व पिंपळगाव (घोडेगाव), खिरेश्वर (आळेफाटा), कुसुर (जुन्नर) व निमगाव सावा (नारायणगाव उपविभाग) या पाच ग्रामपंचायतींमध्ये आयोजन करण्यात आले आहे


