पुणे: महावितरणच्या मंचर विभागात त्रिसुत्री एकदिवसीय कार्यक्रमातील उपक्रमांना पाच ग्रामपंचायतींमध्ये गुरुवारी (दि. 26) सुरवात होत आहे. या उपक्रमात मागेल त्यांना नवीन वीजजोडणी, वीजदेयकांची व यंत्रणेची दुरुस्ती आदी कामे केली जाणार आहे.
या आठवड्यात मंचर विभागातील (कंसात उपविभाग) निरगुडसर (मंचर), लांडेवाडी (घोडेगाव), पिंपळवंडी (नारायणगाव), बुचकेवाडी (जुन्नर) आणि टिकेकरवाडी (आळेफाटा) या ग्रामपंचायतींमध्ये गुरुवारी (दि. 26) त्रिसुत्री एकदिवसीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यापुढे मंचर विभागात दर गुरुवारी प्रत्येक उपविभागातील एक अशा एकूण पाच ग्रामपंचायतीमध्ये हा उपक्रम घेण्यात येणारआहे.
विद्युत ग्रामस्वच्छ अभियान, वीज देयक दुरुस्ती व महावितरण आपल्या दारी हे तीन उपक्रम एकाच दिवशी या त्रिसुत्री कार्यक्रमात राबविण्यात येणार आहे. विद्युत ग्रामस्वच्छ अभियानात झुकलेले वीजखांब सरळ करणे, लोंबकळणार्या तारांची, रोहित्र बॉक्सची दुरुस्ती आदी काम होतील. वीजबिल दुरुस्ती अभियानात वीजग्राहकांची वीजबिले जागेवरच दुरुस्त करणे, वीजमीटरचे रिंडींग होत नसल्यास ते घेणे व वीज देयक दुरुस्त करून देणे, सदोष व नादुरुस्त मीटर बदलून देणे आदी कामे तर महावितरण आपल्या दारी या उपक्रमात मागेल त्यांना नवीन वीजजोडणी देणे, प्रतीक्षा यादीनुसार वीजजोडणी देण्याची अंमलबजावणी करणे, ग्राहकांना वीज देयके मिळत नसल्यास ते उपलब्ध करून देणे आदी कामे करण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे संबंधीत उपविभागातील सर्व अभियंते, कर्मचारी व जनमित्र ग्रामपंचायतीमध्ये त्रिसुत्री एकदिवसीय कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी सहभागी होणार आहे. मंचर विभागातील संबंधीत ग्रामपंचायतीमधील वीजग्राहकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे.


