पुणे-बेहिशोबी मालमत्ता गोळा केल्याप्रकरणी दोन वर्षापेक्षा अधिक काळ तुरुंगात घालविल्यानंतर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची नुकतीच जामिनावर सुटका झाली आहे. सध्या त्यांच्यावर केईएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत. रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर परत एकदा राज्याच्या राजकारणात कमबॅक करण्यासाठी ते सज्ज झाले आहेत. पुणे शहरात 10 जून रोजी होणा-या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात ते जाहीर भाषण करणार आहेत
आपल्या वेगळ्या भाषणशैलीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या भुजबळ यांच्या भाषणाकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष असणार आहे. भुजबळ यांची सुटका झाल्यानंतर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जल्लोष करण्यात आला होता. त्यांच्या समर्थकांनी कुठे डिजेच्या तालावर ठेका धरला तर कुणी फटाके फोडून जल्लोष साजरा केला. पुण्यातही आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने दगडुशेठ गणपतीची आरती करून आणि पेढे वाटून हा आनंदोत्सव साजरा केला होता.
भुजबळ यांच्या सुटकेनंतर काही कार्यकर्त्यांनी केईएम रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली. परंतु, अजुनही अनेक कार्यकर्त्यांना भुजबळ समोर येण्याची उत्सुकता लागली आहे. कार्यकर्त्यांची ही उत्सुकता लवकरच संपणार असून 10 जून रोजी पुण्यात होणा-या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात भुजबळ यांची तोफ धडाडणार हे निश्चित झाले आहे.
बेहिशोबी मालमत्ता गोळा केल्याप्रकरणी छगन भुजबळ 14 मार्च 2016 पासून मुंबईच्या ऑर्थर रोड कारागृहात होते. त्यांनी 2 एप्रिल रोजी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत जामिनासाठी अर्ज केला होता. त्यानंतर शुक्रवारी (4 एप्रिल) न्यायालयाने भुजबळांना दिलासा देत त्यांचा जामीन मंजूर केला होता. यापूर्वी त्यांनी तब्बल 9 वेळा जामिनासाठी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते, मात्र त्यांना यश येत नव्हते.