भारत – पाक सामन्यात अमिताभ करणार कॉमेंट्री
मुंबई- क्रिकेट विश्वचषकात १५ फेब्रुवारी रोजी भारत – पाकिस्तानमध्ये होणा-या सामन्यात बिग बी अर्थात सुपरस्टार अमिताभ बच्चन हे कॉमेंट्री (समालोचन) करणार आहेत. त्यामुळे क्रिकेटमधील कट्टर प्रतिस्पर्धी आणि त्यावर भारदस्त आवाजातील बिग बींची कॉमेंट्री असा दुर्मिळ अनुभव भारतातील क्रिकेटप्रेमींना अनुभवता येणार आहे.
महानायक अमिताभ बच्चन यांचा आगामी महिन्यात एक चित्रपट प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या प्रोमोशनसाठी सिनेनिर्मात्यांनी अनोखी शक्कल लढवली आहे. यानुसार बिग बी हे थेट भारत -पाक सामन्यात समालोचक म्हणून उपस्थित राहणार आहे. बच्चन यांच्यासोबत कपिल देव, शोएब अख्तर, हर्ष भोगले हे त्रिकूटही समालोचक म्हणून उपस्थित असतील. क्रिकेट आणि सिनेमाशी भारतीयांचे भावनिक नाते असून समालोचक म्हणून काम करण्यास मी उत्साहीत आहे असे अमिताभ बच्चन यांनी म्हटले आहे.