नवी दिल्ली-‘भाजप सोड, नाहीतर परिणाम भोगायला तयार राहा. नरेंद्र मोदीही तुला वाचवू शकणार नाहीत’, अशा धमकीचा फोन भाजपचे प्रवक्ते शाहनवाज हुसेन यांना दुबईहून आल्यानं त्यांचे कुटुंबीय, समर्थक हादरले असून पक्षनेत्यांमध्येही काळजीचा सूर ऐकू येतोय. या फोनसंदर्भात हुसेन यांनी संसद मार्ग पोलीस स्टेशनात तक्रार दाखल केली आहे.
दुबईतील एका नंबरवरून शनिवारी रात्री साडेअकराच्या सुमारास आपल्याला दोन फोन आले. तेव्हा आपण पाटण्याहून दिल्लीत पोहोचलो होतो आणि विमानतळावरून घरी जात होतो. पलीकडची व्यक्ती अत्यंत अर्वाच्य भाषेत बोलत होती. विविध वाहिन्यांवरून मोदी सरकारचं समर्थन केल्याबद्दल त्यानं शिवीगाळ केली आणि भाजप सोडण्याची धमकी दिली, असं शाहनवाज हुसेन यांनी तक्रारीत म्हटलं आहे. पक्षातून बाहेर न पडल्यास मोदीही वाचवू शकणार नाहीत, असंही त्यांना बजावण्यात आलंय.
या तक्रारीची गंभीर दखल घेऊन तपास सुरू करण्यात आला आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. हा फोन नेमका कुणी केला असावा, यावरून वेगवेगळे कयास बांधले जात आहेत.