मुंबई -तडजोडी सफल होईनात ,एकमेकांवर विश्वास बसेना अशा अवस्थेत सध्या भाजपा-शिवसेनेतील सत्ता स्थाप्नाबाबाटची स्थिती असून विश्वासदर्शक ठरावाआधी मंत्रिमंडळात स्थान देण्याची शिवसेनेची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धुडकावल्याची माहिती सूत्रांकडून मिळत असून मुख्यमंत्र्यांच्या या ताठरपणाला शिवसेना सरकारविरोधात मतदान करून प्रत्युत्तर देण्याची शक्यता नाकारता येणारी नसल्याचे बोलले जाते
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि संरक्षण मंत्री अरुण जेटली यांच्या विनंतीनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस सरकारच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहिले होते. त्यामुळे भाजपचा जीव भांड्यात पडला, असे वाटत होते. मात्र, शिवसेनेने भाजप सरकारला पाठिंबा देण्याबाबत अद्यापही पत्ते उघड केलेले नाहीत. शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपदासह सत्तेत एक तृतियांश वाटा हवा असून त्याबाबत जोपर्यंत ठोस निर्णय होत नाही, तोपर्यंत भाजपला झुलवत ठेवण्याचे शिवसेनेने ठरवल्याचे दिसत आहे. भाजपकडून अरुण जेटली यांची शिवसेनेशी बोलणी सुरू असल्याचे कळते. मात्र, भाजपसोबत फरफटत जायचे नाही, असाच बाणा शिवसेनेने अंगिकारला आहे. उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेला सत्तेची घाई नाही, असे सांगून भाजप नेत्यांना योग्य तो संदेश दिला आहे.
यापार्श्वभूमीवर आता चेंडू भाजपच्या कोर्टात असल्याचे दिसत असून सरकार वाचवण्यासाठी शिवसेनेला साकडे घालण्याच्या मनस्थितीत सध्या तरी भाजप नाही आहे. ६ वा ९ नोव्हेंबर रोजी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. यावेळी शिवसेनेचे मंत्री शपथ घेतील, अशी शक्यता वर्तविली जात होती. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी बहुमत सिद्ध झाल्याशिवाय मंत्रिमंडळ विस्तार नाही, असे आता ठणकावल्याचे कळत आहे. याबाबत अधिकृतरीत्या कोणीही काहीही बोण्यास तयार नसल्याचे हि दिसते आहे