पुणे -भाजप ची ऑफर मी धुडकावली ,त्यांच्याकडे माझा सामना करु शकेल असा शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात उमेदवारच नाही असा दावा करून विद्यमान आमदार विनायक निम्हण हे सायकल फेरी काढून गुरुवारीदि २५ रोजी कॉंग्रेस पक्षातर्फे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या वेळी किमान 200 सायकलस्वार कार्यकर्ते उपस्थित असतील, अशी माहिती निम्हण यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
निम्हण म्हणाले, “”शहरातील वाढत्या प्रदूषणाचा विचार करून सायकलवरून जाऊन उमेदवारी अर्ज भरणार आहे. सोमेश्वर मंदिरातून सकाळी साडेआठ वाजता फेरीस प्रारंभ होईल. मतदारसंघात सर्वत्र फिरून दुपारी दोनच्या सुमारास अर्ज दाखल करणार आहे.‘‘ या निवडणुकीदरम्यान कोठेही शोभेच्या दारूची आतषबाजी करणार नाही, असेही त्यांनी नमूद केले.””कॉंग्रेस पक्षाकडून माझी उमेदवारी दोन दिवसांत निश्चित होईल, त्या वेळी शहर कॉंग्रेसचे सर्व पदाधिकारी उपस्थित असतील. उमेदवारी अर्ज भरतानाही कॉंग्रेसचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते येणार आहेत.‘‘
शिवाजीनगरमधून कॉंग्रेसची उमेदवारी मला मिळणार, हे नक्की आहेच; परंतु पक्षाने अन्य कोणालाही उमेदवारी दिली तरी मी कॉंग्रेसचाच प्रचार करणार आहे, असे निम्हण यांनी स्पष्ट केले. उमेदवारी मिळाली नाही म्हणून बंडखोरी करायची, असा माझा विचारही नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यापूर्वी भाजप प्रवेशाची चर्चा होती, त्याबाबत ते म्हणाले, “”भाजपमध्ये येण्यासाठी मला “ऑफर‘ होती; परंतु मी गेलो नाही. पक्षात विरोधक आहेत; पण त्यांची पर्वा न करता मी काम करणार आहे. केलेल्या विकासकामांच्या बळावर मतदार मला पुन्हा निवडून देतील यात शंका नाही. भाजपकडे मतदारसंघासाठी उमेदवारही नाही, हेच माझ्या यशाचे गमक आहे.‘‘
कॉंग्रेस भवनमध्ये झालेल्या या पत्रकार परिषदेस शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील मुकारी अलगुडे, बळीराम सावंत, सुरेश कांबळे, शशिकला गायकवाड, कैलास पवार, दुर्योधन भापकर, कमलेश चासकर, रणजित गायकवाड, संगीता कचरे, शहानवाज कर्नळकर, सनी निम्हण आदी उपस्थित होते. मात्र, शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष आणि पदाधिकारी अनुपस्थित होते.
याबाबत विचारणा केली असता निम्हण म्हणाले, “”कॉंग्रेस पक्षाकडून माझी उमेदवारी दोन दिवसांत निश्चित होईल, त्या वेळी शहर कॉंग्रेसचे सर्व पदाधिकारी उपस्थित असतील. उमेदवारी अर्ज भरतानाही कॉंग्रेसचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते येणार आहेत.‘‘असेही निम्हण यांनी सांगितले.