पुणे – सुडबुद्धीनेच कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांना नॅशनल हेरल्ड प्रकरणात गोवण्यात येत असल्याचा आरोप करत, पुणे शहर कॉंग्रेसच्या वतीने रविवारी शहरातील सर्व विधानसभा मतदारसंघांत भाजप सरकारच्या सूडनीतीचा निषेध करण्यासाठी आंदोलन करण्यात आले.
नॅशनल हेरल्डप्रकरणी सोनिया आणि राहुल शनिवारी न्यायालयात हजर झाले होते. त्याचे पडसाद शहरातही उमटले. या घटनेच्या निषेधार्थ शहर कॉंग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले. केंद्रातील भाजप सरकारचा निषेध करत त्यांच्याविरोधात घोषणा देण्यात आल्या. पक्षाचे शहराध्यक्ष अभय छाजेड, युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम, पक्षाचे निरीक्षक प्रकाश सातपुते, माजी आमदार उल्हास पवार, मोहन जोशी, रमेश बागवे, बाळासाहेब शिवरकर, उपमहापौर आबा बागूल, रोहित टिळक, नीता रजपूत यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
पर्वती मतदारसंघातर्फे पुणे-सातारा रस्त्यावर दुपारी केलेल्या आंदोलनात सचिन आडेकर, प्रकाश आरणे यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. शिवाजीनगर मतदारसंघातर्फे ज्ञानेश्वर पादुका चौकात झालेल्या आंदोलनात माजी महापौर दत्तात्रेय गायकवाड, नगरसेवक दत्ता बहिरट, मुकारी अलगुडे सहभागी झाले होते. कसबा मतदारसंघात स्वाती कथलकर यांच्या नेतृत्वाखाली महिला आघाडीने केंद्र सरकारचा निषेध केला. पुणे कॅंटोन्मेंट मतदारसंघातर्फे संत कबीर चौकात आंदोलन करण्यात आले. त्यात माजी आमदार रमेश बागवे, नगरसेवक अविनाश बागवे, नुरुद्दीन सोमजी, रशीद शेख, लता राजगुरू सहभागी झाल्या होत्या. वडगाव शेरीत पर्णकुटी चौकात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केले. संगीता देवकर, नगरसेविका सुनीता गलांडे, शीतल सावंत, सुनील मलके, हुलगेश चलवादी सहभागी झाले होते.
हडपसर मतदारसंघातर्फे गाडीतळ परिसरात झालेल्या आंदोलनात माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, प्रशांत तुपे, नगरसेवक सतीश लोंढे, विजया वाडकर, कविता शिवरकर, चंद्रकांत मगर सहभागी झाले होते. माजी उपमहापौर प्रसन्न जगताप यांच्या नेतृत्वाखाली सिंहगड रस्त्यावर आंदोलन करण्यात आले. त्यात हरिदास चरवड, आबा जगताप, किशोर कुलकर्णी आदींनी सहभाग घेतला. कोथरूड, कसबा, खडकवासला या विधानसभा मतदारसंघांतही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केले.






