पुणे :
‘पुण्यभूषण फाऊंडेशन’(त्रिदल, पुणे) आणि पुणेकरांच्या वतीने दिला जाणारा ‘पुण्यभूषण पुरस्कार’ श्री. भाई वैद्य यांना देण्यात येणार आहे. हा पुरस्कार त्यांना सामाजिक क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी देण्यात येत आहे, अशी माहिती ‘पुण्यभूषण फाऊंडेशन’चे अध्यक्ष डॉ. सतीश देसाई यांनी पत्रकाद्वारे दिली.
एक लाख रूपये रोख आणि बालशिवाजींची पुण्याची भूमी सोन्याच्या फाळाने नांगरित असलेली प्रतिमा, पुण्याच्या ग्राम देवतांसह असलेल्या या वैशिष्ठपूर्ण स्मृतिचिन्हाने या वर्षीच्या पुण्यभूषण पुरस्कार्थी श्री.भाई वैद्य यांना गौरविण्यात येणार आहे. हा पुरस्कार पद्मविभूषण डॉ.रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने देण्याचे ठरविले आहे. मे महिन्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
या पुरस्काराचे यंदाचे 28 वे वर्ष आहे. पुरस्काराबरोबर सहा ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिकांनाही गौरविण्यात येणार आहे. यामध्ये शंकर बुरुंगले ,बाबुराव पाटील (किवळकर), यशवंत नामजोशी, बाळासाहेब जांभूळकर, अरविंद मनोलकर, दत्ता गांधी यांचा समावेश आहे.
या आधी ‘पुण्यभूषण पुरस्कार’ ज्येष्ठ गायक कै.पं.भीमसेन जोशी, राजा दिनकर केळकर संग्रहालयाचे कै.काका केळकर, कै.शंतनुराव किर्लोस्कर, कै.डॉ.बानुबाई कोयाजी, सुप्रसिद्ध साहित्यिक कै.पु.ल.देशपांडे, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, योगाचार्य बी.के.अय्यंगार, कै.डॉ.रा.ना.दांडेकर, डॉ. मोहन धारिया, डॉ.जयंत नारळीकर, कै.प्रतापराव गोडसे, ज्येष्ठ क्रिकेटपटू चंदू बोर्डे, कै.जयंतराव टिळक, डॉ.जब्बार पटेल, राहुल बजाज, कै.डॉ.के.बी.ग्रँट, विख्यात नृत्यसाधिका कै.डॉ.रोहिणी भाटे, डॉ.बाबा आढाव, ज्येष्ठ अभिनेते डॉ.श्रीराम लागू, शास्त्रज्ञ डॉ.रघुनाथ माशेलकर, डॉ.शां.ब.मुजुमदार, डॉ.रा.चिं.ढेरे, डॉ.ह.वि.सरदेसाई, निर्मला पुरंदरे, सुधीर गाडगीळ, डॉ.सायरस पूनावाला आणि प्रतापराव पवार या मान्यवरांना प्रदान करण्यात आले होते.


