
पुणे: नेहा भाटे, परिमल फडके आणि पवित्र भट या दिग्गज कलाकारांनी सादर केलेल्या भरतनाटयमच्या नृत्याविष्कारातून संतांच्या तत्वज्ञानाची अनुभूती रसिक प्रेक्षकांनी घेता आली. खडके फाउंडेशनच्या ‘देखिला देवो’ या संतांच्या रचनांवरील सी. डी. प्रकाशनानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सुप्रसिध्द व्हायोलियनवादक प्रभाकर जोग यांच्या हस्ते बालगंधर्व रंगमंदिर येथे सी. डी. चे प्रकाशन करण्यात आले. श्री संत सेवा संघाचे संस्थापक संजय गुरुजी, स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पंडित विद्यासागर, राज्याचे पर्यटन संचालक सतीश सोनी, प्रतिष्ठानचे संजय खडके यावेळी उपस्थित होते.
ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, श्रीनिळोबाराय या संतांनी रचलेले अभंग आणि वारकरी संप्रदायाला भक्तिरसात चिंब करणाऱ्या ‘गजरा’चा सी. डी. मध्ये समावेश आहे. संजय गुरुजी यांनी संहिता लेखन केले असून जीवन धर्माधिकारी यांनी संगीत दिले. पंडित रघुनंदन पणशीकर व जितेंद्र अभ्यंकर यांचा स्वर असून स्वर्णिमा यांनी निरुपण केले आहे.
पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या भव्य प्रतिकृतीसमोर नेहा भाटे, परिमल फडके आणि पवित्र भट या कलाकारांनी भरतनाटयमच्या माध्यमातून संतांचे तत्वज्ञान उलगडून सांगितले. अशाप्रकारचा हा पहिलाच प्रयोग होता.
‘अनुपम्य मनोहर, कासे शोभे पीतांबर’, ‘कैवल्याचा गाभा, व्यापूनिया ठेला नभा’, ‘लेकुराचे हित, वाहे माऊलीचे चित्त’ आदी संतरचनांचे निरूपण, सादरीकरण व नृत्याविष्कार आणि’जय जय विठोबा रखुमाई’, ‘ज्ञानेश्वर माऊली जय ज्ञानराज माऊली तुकाराम’ हा वारकरी संप्रदायाला प्राणाहून प्रिय असणारा गजर आणि पालखी, रिंगण, फुगडया, फेर ही वारीतील मनोहारी दृष्ये रसिकांना टिपता आली.
मारुती तुपे, ओमप्रकाश वाघमारे, दीपक राठोड या कार्यकर्त्यांना विविध क्षेत्रातील योगदानाबद्दल प्रत्येकी पंचवीस हजार रुपयांची शिष्यवृत्ती देऊन गौरविण्यात आले.

