पुणे : महावितरणच्या पुणे परिमंडल अंतर्गत देखभाल व दुरुस्तीची कामे थेट लॉटरी पद्धतीने देण्यासाठी तसेच
फिडर व्यवस्थापक म्हणून नेमणुकीबाबत बेरोजगार विद्युत अभियंत्यांसाठी सोमवारी (दि. 3 ऑगस्ट) सकाळी 11 वाजता
मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
महावितरणच्या प्रशासकीय इमारत परिसर, केईम हॉस्पीटलसमोर, रास्तापेठ, पुणे येथील रिक्रिएशन हॉलमध्ये
हा मेळावा होईल.
बेरोजगार विद्युत अभियंत्यांना एकूण वार्षिक कामांपैकी किमान 50 टक्के ठराविक नवीन आणि देखभाल व
दुरुस्तीची कामे बेरोजगार विद्युत अभियंत्यांना लॉटरी पद्धतीने देण्यात येणार आहे. पहिल्या वर्षी प्रत्येकी 10 लाख
रुपयापर्यंतची वार्षिक 50 लाखांची कामे मिळणार आहे. ही कामे मुदतीत पूर्ण केल्यानंतर दुसर्या वर्षी 15 लाखांपर्यंतची
एकूण वार्षिक पाच कामे अशी एकूण 75 लाखांपर्यंतची कामे देण्यात येणार आहे.
तसेच वाणिज्यिक व वितरणाची अधिक हानी असलेल्या वाहिन्यांवर फिडर व्यवस्थापक म्हणून बेरोजगार
विद्युत अभियंता किंवा सेवानिवृत्त अभियंते यांची नेमणूक करण्यात येणार आहे. फिडर व्यवस्थापक म्हणून संबंधीत
वाहिनीवरील मीटर रिडींग, बील वाटप, नवीन वीजजोडणी, वीजचोरीविरोधात कारवाई व सर्वसाधारण देखभाल अशी
कामे दिली जाणार आहे. सोबतच आयटीआय झालेले 5 जण सहाय्यक म्हणून राहणार आहे.
या मेळाव्यात देखभाल व दुरुस्ती व फिडर व्यवस्थापनाच्या कामांची माहिती, नोंदणी अर्ज, तांत्रिक माहिती आदींबाबत
मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या मेळाव्याचा बेरोजगार विद्युत अभियंत्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणने
केले आहे.