मैत्र पिढ्यांचे जपे वारसा,
कला संस्कृती मायबोलीचा
हे ब्रीद वाक्य घेऊन अमेरिकेत ३०वर्षा पूर्वी स्थापन झालेले बृहन्महाराष्ट्र मंडळ आपले १७ वे अधिवेशन या वर्षी ३ ते ५ जुलै २०१५ रोजी ‘अनाहेम कन्व्हेन्शन सेंटर’ लॉस एंजलीस येथे भरणार असून या अधिवेशनाचे उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार असल्याचे समन्वयक शैलेश शेट्ये यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच विवेक रणदिवे विशेष अतिथी असणार आहेत.आजच्या घडीला अमेरिकेत ३४ ठिकाणी मराठी शाळा असून १००० मुले त्यात शिकत असल्याचेही त्यांनी सांगितले.
या तीन दिवसात विविध कार्यक्रम होणार असून या अधिवेशनाला ५००० लोक उपस्थित असतील असा आयोजकांचा होरा आहे असे संजीव कुवाडेकर यांनी सांगितले यात संगीत, नाटक, व्याख्यान, कार्यशाळा असणार आहेत अच्युत गोडबोले ‘नव्या विचारांची दिशा’ या विषयावर आपले मत मांडणार आहेत तर ‘प्राईम टाईम’ चे आकर्षण असणार आहे अवधूत गुप्ते व वैशाली सामंत यांचा लाईव्ह मुझिक कॉन्सर्ट यात अभिजित खांडकेकर अँन्कर असणार आहे. तर पारितोषिक विजेते ‘गोष्ट तशी गमतीची’ हे नाटक दाखवण्यात येणार आहे. भारतातून तब्बल ७५ कलाकार जाणार असून अधिवेशनाच्या समारोपाला अजित भुरे दिग्दर्शित ‘लग्न पहावे करून’ हे नाटक दाखवण्यात येणार आहे.
इतर कार्यक्रमामध्ये मराठी चित्रपटाला १०० वर्ष पूर्ण झाल्या निमीत्त ‘गोष्ट एका काळाची काळ्या पांढरया पडद्याची’ ही नाटिका सादर होणार आहे. चिन्मय मांडलेकर ‘कथा कोलाज’ हा कार्यक्रम करणार असून, ‘गन्धर्व’ हा संगीतावर आधारित कार्यक्रमही असेल तसेच द्वारकानाथ संझगिरी यांचा ‘मला भेटलेले लीजंड्स’ हा कार्यक्रम असेल. सत्यजित पाध्ये बोलक्या बाहुल्यांचा कार्यक्रम करणार असून ते लहान मुलांना शिकवणार सुद्धा आहेत.
कार्यक्रम जरी ३ जुलै पासून सुरु होणार असला तरी २ जुलै रोजी जादूची पेटी व फॅशन शो असणार आहे. या अधिवेशनात बिजनेस एक्सपोमध्ये दागिने, कपडे, फूड, घरे, यांचे बूथ असणार आहेत. मराठी माणसाला उद्योगप्रिय करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी एक विशेष कार्यक्रम २ जुलैला ठेवण्यात आला आहे. हर्षा भोगले लीडरशिपवर व्याख्यान देणार आहेत. बॉलीवूड व हॉलीवूड मधील दिग्दर्शक, निर्माते, लेखक यांना एकत्र आणून त्यांच्या वैचारिक देवाण-घेवाण करण्यात येईल. तसेच जेष्ठ नागरीकांसाठी एक खास सेमिनार असेल त्याचप्रमाणे अमेरिकेत असलेल्या मराठी डॉक्टरांसाठी एक सेमिनार असेल.
उत्तर अमेरिकेतील लोक एक खास कार्यक्रम सदर करणार आहेत यात मराठी गझल, नाटक, संगीत, विनोदी नाटक, असणार आहेत. त्याचप्रमाणे ‘सा रे ग म’ हा लहान मुल, तरुण व वयस्क यांच्यासाठी मराठे ज्वेलर्सतर्फे एक स्पर्धा आयोजित करण्यात आली असून या अधिवेशनात त्याची फायनल असेल.
अतुल कुलकर्णीचा ‘सेतू बांधूया’ हा आगळा-वेगळा कार्यक्रम असेल. सर्वात महत्वाचे म्हणजे या तीन दिवसात अमेरिकेत अस्सल मराठी जेवण असणार असून यात साबुदाणा खिचडी, वडा पाव, फणसाची भाजी, मसाला भात, जिलेबी, आमरस, पुरणपोळी, सोलकढी, बिर्याणी, तळलेले मासे असे पदार्थ मिळणार असून हे पदार्थ खाण्यासाठी अमेरिकेतील लोकांची झुंबड उडणार हे नककी.