बीड जिल्ह्यातील 214 विषबाधाग्रस्त रूग्णांना ‘डायल 108’ सेवेचा हात
पुणे :
राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने आणि ‘बीव्हीजी इंडिया लिमिटेड’ या सेवा क्षेत्रातील कंपनीच्या माध्यमातून चालविण्यात येणार्या ‘महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस’च्या सुसज्ज ‘डायल 108’ सेवेच्या वतीने बीड जिल्ह्यातील शिरसाळा येथे अन्नातून झालेल्या विषबाधाग्रस्त रूग्णांना तत्काळ वैद्यकीय सेवा देण्यात आली. सहा रूग्णवाहिकांच्या मदतीने 214 विषबाधाग्रस्त रूग्णांना तातडीने ‘डायल 108’ सेवेद्वारे प्रथमोपचार करून नजीकच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले, अशी माहिती ‘महाराष्ट्र इमर्जन्सी मेडीकल सर्व्हिस’चे मुख्य संचालन अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर शेळके यांनी दिली.
वानवडी प्राथमिक आरोग्य केंद्र, शिरसाळा प्राथमिक आरोग्य केंद्र, माजलगाव ग्रामीण रूग्णालय, अंबाजोगाई मेडिकल कॉलेज, परळी वैजनाथ उपजिल्हा रूग्णालय, गंगाखेड उपजिल्हा रूग्णालय, सोनपेठ प्राथमिक आरोग्य केंद्र येथील रूग्णवाहिकांनी मदतकार्याच्या घटनास्थळी पोहोचून रूग्णांवर तातडीने उपचार मदतकार्य सुरू केले. अशी माहिती महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस’ चे जिल्हा व्यवस्थापक अविनाश राठोड, सुनील कुलकर्णी यांनी दिली .