‘बीडीपी’ हा नागरिक चळवळीचा विजय- खा.अॅड.वंदना चव्हाण – नागरिक, संस्था, पर्यावरणप्रेमींनी केला आनंद व्यक्त
पुणे :
‘पुढील पिढ्यांना चांगले पर्यावरण, आरोग्य मिळावे यासाठी जैव वैविध्य उद्यानांचे 23 गावातील टेकड्यांवरील आरक्षण कायम ठेवण्याचा नगरविकास कामाचा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्णय स्वागतार्ह आहे, हा 13 वर्षांच्या नागरिक चळवळीचा विषय आहे. मात्र ही सुरूवात असून इथून पुढे अधिक संघटितपणे टेकड्यांवरील अतिक्रमणांविरूद्ध लढावे लागणार आहे, ’ असे खासदार अॅड.वंदना चव्हाण यांनी आज सांगितले.
23 गावातील टेकड्यांवर ‘बायो डायव्हर्सिटी पार्क’ (बी.डी.पी.)चे आरक्षण कायम ठेवण्यार्या नगरविकास खात्याच्या अधिसूचकतेचे स्वागत करण्यासाठी आज पर्यावरण प्रेमी नागरिक, संस्थांनी इंद्रधनुष्य पर्यावरण व नागरिकत्व केंद्र येथे बैठक घेतली. त्यावेळी खासदार वंदना चव्हाण बोलत होत्या. याप्रसंगी खा.वंदना चव्हाण यांनी आपल्याला स्व.मोहन धारिया यांनी सतत पाठींबा दिल्याची कृतज्ञ आठवण सांगितली तसेच स्व.गीता वीर आणि स्व. बी.जी.देशमुख यांचाही उल्लेख आवर्जून केला.
नगररचना तज्ज्ञ अनिता गोखले-बेनिंजर, सुजीत पटवर्धन, सतीश खोत, प्रा.विजय परांजपे, सेना नेते रमेश बोडके, सेव्ह पुणे हिल्स् इनिशिएटिव्ह चे अध्यक्ष दीपक बिडकर व्यासपीठावर, सचिव ललित राठी उपस्थित होते.
पुणेकरांचे संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यात शिवामंत्री सारंग यादवाडकर, डॉ.सचिन पुणेकर, विवेक वेलणकर, तन्मय कानिटकर, संजिवनी जोगळेकर, सायली पाळंदे-दातार, अॅड.परळीकर, हेमंत चव्हाण, भानू मुळे, माजी महापौर मोहनसिंह राजपाल, नितीन उर्फ बबलू जाधव, आनंद रिठे आदी उपस्थित होते.
खासदार अॅड.वंदना चव्हाण म्हणाल्या, ‘भारतातील कोणत्याही शहराला पर्यावरण राखण्यासाठी असे आरक्षण मिळालेले नाही. ही अभूतपूर्व घटना असून, 13 वर्षांचा नागरिक चळवळीचा परिणाम आहे. अतिक्रमणे होऊ नयेत यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहिले पाहीजे आणि अतिक्रमणांसाठी तेथील अधिकार्यांना जबाबदार धरण्याच्या तरतुदीचा वापर केला पाहिजे.’
अनिता गोखले-बेनिंजर म्हणाल्या, ‘या आरक्षणासाठी खूप अभ्यास करण्यात आला. स्व.मोहन धारिया यांनी यासमितीत काम करण्याची जबाबदारी सोपविली, आणि कोणत्याही परिस्थितीत मागे हटायचे नाही असे बजावले होते. ती जबाबदारी पार पडल्याचा आनंद आहे. बीडीपी जागांच्या पर्यावरणासाठी चांगला उपयोग करण्याचे नियोजन आम्ही आजपासून सुरू करीत आहोत.
सेव्ह पुणे हिल्स इनिशिएटिव्ह चे दीपक बिडकर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी उपस्थितांना अनिता बेनिंजर-गोखले यांच्या वतीने पेढे वाटण्यात आले.