मोतिहारी -रुग्णालयात गरीबांवर उपचार करताना हयगय केल्यास मी डॉक्टरांचे हात तोडून टाकेल.असा इशारा शुक्रवारी एका रुग्णालयाच्या उद्घाटन सोहळ्यात बिहारचे मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांनी येथे दिला ते म्हणाले, उपचारात हयगय करणा-या डॉक्टरचे नाव लिहून चिठ्ठी माझ्याकडे पाठवा, आम्ही त्याला घरू बसवू. गरीबांवर अन्याय कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही. राज्यातील एकही कुटुंब भूमीहिन असणार नाही.अशीही घोषणा त्यांनी केली आहे
यापृवी झालेल्या एका कार्यक्रमात ते म्हणाले ,प्रशासन दलितांना सावत्र वागणूक देत आहे, ते चुकीचे आहे. भूमीहीन असणा-यांना कागदपत्रे मिळतात पण जमीन मिळवण्यासाठी त्यांना भटकत राहावे लागते. त्यामुळे याप्रकरणी ठोस कारवाई करण्यासाठी अभियान चालवले जाणे गरजेचे आहे. या अभियानात कामचुकारपणा करणा-या अधिका-यांवर कारवाई करणार असल्याचेही ते म्हणाले. आगामी काही वर्षात राज्यातील एकही कुटुंब भूमीहिन असणार नाही. सरकार सर्वांना जमीन उपलब्ध करून देणार असल्याचे ते म्हणाले.
पोलिस ठाण्यांत तक्रार दाखल करून घेण्यात विनाकारण विलंब करण्यासंदर्भात मांझी म्हणाले की, ‘अशा प्रकरणांची तक्रार आमच्याकडे करा. केवळ एक चिठ्ठी लिहून मुख्यमंत्री, बिहार यांच्या नावाने पाठवा. त्याची लगेचच चौकशी केली जाईल. दोषी आढळल्यास संबंधिताला निलंबित न करता थेट बडतर्फ करण्याची कारवाई केली जाईल. तपासात उशीर करणा-या अधिका-यांनाही त्यांनी इशारा दिला. सहा महिन्यापेक्षा अधिक काळ एखाद्या प्रकरणाच्या तपासासाठी लागल्यास, कावाईसाठी तयार राहा असे, मांझी म्हणाले आहेत. दोन चार अधिका-यांवर कारवाई झाल्यास आपोआप परिस्थिती सुधारेल असे मांझी म्हणाले.