वर्धमानपुरा सोसायटीतील अस्वच्छतेबद्दल बिल्डरवर
कारवाई करण्याचे नगरसेविका मानसी देशपांडे यांचे प्रशासनाला आदेश
पुणे :
मार्केटयार्डजवळील वर्धमानपुरा उच्चभ्रू सोसायटीतील अस्वच्छता, घाण, दूषित पाणी पाहून महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी बिल्डरवर कारवाई करावी, असे आदेश नगरसेविका सौ.मानसी देशपांडे यांनी रविवारी दिले. रविवारी सोसायटीतील रहिवाशांनी “स्वच्छ भारत अभियाना’चे आयोजन केले होते. “सुयोग ग्रुप’, “जैन आशापुरी ग्रुप’, “लिजेंड ग्रुप’, “कुबेर प्रॉपर्टीज’ यांनी संयुक्तपणे बांधलेल्या या सोसायटीमध्ये 300 फ्लॅट्स आहेत. बिल्डरनी सोसायटीला हस्तांतरण केलेले नाही. देखभालीसाठी कोट्यवधी रुपये गोळा केले आहेत. मात्र, अस्वच्छतेपोटी पालिकेने मागील आठवड्यात डेंग्यू आळ्या सापडल्याने 11 हजार रुपये दंड केलेला आहे. तरीही बिल्डरने दुर्लक्ष केल्याने सौ. मानसी देशपांडे यांनी या बिल्डर मंडळींवर कारवाई करावी, असे अधिकाऱ्यांना सांगितले. बंद पोहण्याचा तलाव, ठिकाठिकाणी साचून राहिलेले पाणी, अस्वच्छता यामुळे सोसायटीतील 20 जणांना डेंग्यूची लागण झालेली आहे, अशी माहिती रहिवासी भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते शामसुंदर कलंत्री यांनी दिली.
यावेळी स्वच्छता अभियानाने स्वच्छतेस प्रारंभ करण्यात आला. श्यामसुंदर कलंत्री, हर्षद लोढा, अनिल पोरवाल, अमित मुनोत, राजू सुराणा, माणिक बोकरीया, मीना कलंत्री, रश्मी ढालावत, फुटरमल खिंवसरा, महेश खिंवसरा, अशोक खिंवसरा, सोहनलाल परमार, वालचंद कटारिया, माधुरी राठोड आदी 200 जणांचा सहभाग होता. बिल्डरवर कारवाईची मागणीही यावेळी करण्यात आली.

