अहमदनगर -आदिवासी भागात बिबट्यांचा वावर व त्यांच्याकडून नागरिकांवर होणारे हल्ले नवीन नाहीत. मात्र, बिबट्याच्या तावडीत अडकलेल्या लहान बहिणीची जिवाची पर्वा न करता सुटका करण्याचे धाडस नगर जिल्ह्यातील अश्विनी बंडू उघडे हिने दाखवले होते. तिच्या या पराक्रमाची राष्ट्रपती भवनाकडून दखल घेण्यात आली असून तिला यंदाचा बालशौर्य पुरस्कार जाहीर झाला आहे. २६ जानेवारीला राष्ट्रपतींच्या हस्ते अश्विनीला पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील मेहेंदुरी (ता. अकोले) येथील बंडू उघडे हे मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरर्निवाह करतात. त्यांना दोन मुली व एक मुलगा आहे. ९ जून २०१४ ला ते नेहमीप्रमाणे सकाळच्या सुमारास झेंडूच्या शेतीला पाणी भरत होते. त्याच वेळी त्यांच्या अश्विनी व रोहिणी या दोन मुली आंबे गोळा करत होत्या. याच वेळी शेजारच्या उसाच्या शेतातून आलेल्या बिबट्याने रोहिणीवर हल्ला केला. ती प्रचंड घाबरली व जिवाच्या आकांताने ओरडू लागली. तिचा टाहो ऐकताच ११ वर्षीय अश्विनीने घटनास्थळी धाव घेतली. समोर बिबट्या रोहिणीचा पाय ओढत असल्याचे तिला दिसले. हे दृश्य पाहताच क्षणाचाही विचार न करता अश्विनीने बिबट्याचा प्रतिकार करण्यास सुरुवात केली. आरडाओरड सुरू असल्याने त्यांच्या वडिलांनीही धाव घेत बिबट्याला हुसकावून लावले. या हल्ल्यात रोहिणीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिला रुग्णालयात दाखल केल्याने तिचे प्राण वाचले. या घटनेची राष्ट्रपती भवनाने दखल घेतली असून अश्विनीला तिच्या शौर्याबद्दल केंद्र सरकारचा बालशौर्य पुरस्कार जाहीर झाला आहे.
बालशौर्य पुरस्कार जाहीर झाल्यानंतर अश्विनी व रोहिणी या दोन्ही बहिणींनी आनंद व्यक्त केला आहे. २६ जानेवारीला अश्विनी, वडील बंडू उघडे, शिक्षक डी. एस. वैरागकर राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार स्वीकारणार आहेत.