मुंबई, – शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृती स्थिर नसताना उद्धव ठाकरेंच्या दबावामुळे मृत्युपत्रावर बाळासाहेबांची जबरदस्तीने स्वाक्षरी घेतल्याचा दावा जयदेव यांनी केल्यानंतर त्यांच्या संपत्ती बाबतच्या खटल्यात अनोळखी व्यक्तीची लूडबूड सुरु असल्याचे खुद्द मुंबई उच्च न्यायालयानेच म्हटले त्यामुळे या खटल्याला आता वेगळेच वळण लागत असल्याचे चिन्ह आहे . अज्ञात व्यक्तीकडून प्रत्येक सुनावणीनंतर नोंदवलेल्या पुराव्यांची मागणी होत असल्याचे सांगत न्यायालयाने बुधवारी नाराजी व्यक्त केली आहे.
उद्धव ठाकरे आणि जयदेव ठाकरे यांच्यात बाळासाहेब ठाकरे यांच्या संपत्तीवरून वाद सुरु आहेत. या खटल्यातील सुनावणीनंतर अनोळखी व्यक्ती चेंबरमध्ये येऊन नोंदवलेल्या पुराव्यांची प्रत मागत असल्याचे न्यायमूर्ती गौतम पटेल यांनी बुधवारी सुनावणीदरम्यान सांगितले.
जयदेव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूपत्राला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. न्यायमूर्ती गौतम पटेल यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी सुरू आहे. न्यायमूर्ती पटेल यांनी बुधवारी जयदेव ठाकरे यांच्या वकील सीमा सरनाईक आणि उद्धव ठाकरे यांचे वकील राजेश शाह यांना सांगितले की, “एका अज्ञात व्यक्तीने माझ्या चेंबरमध्ये येऊन या प्रकरणात नोंदवलेल्या पुराव्यांची प्रत मागितली आहे. हा अज्ञात व्यक्ती ४ वेळा माझ्या चेंबरमध्ये आला. सरनाईक यांच्या ऑफिसमधील असल्याचे सांगत त्याने पुरावे मागितले. तो नक्की कोण आहे आणि पुरावे मागण्यामागे त्याचा काय उद्देश आहे, याची मला कल्पना नाही. परंतु हे प्रकरण थांबायला हवे, असे न्यायमूर्ती पटेल म्हणाले.”
त्यानंतर जयदेव यांच्या वकील सरनाईक आणि उद्धव यांचे वकील शाह यांना या अनोळखी व्यक्तीचा शोध घेण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. वकिलांनी त्यांच्या ज्युनिअर्सच्या नावे पत्र लिहून हे पुरावे गोळा करण्यासाठी कोण आले होते, याचा शोध घ्यावा असे म्हटले आहे. तर ओळखपत्र दाखवल्याशिवाय ज्युनिअर वकिलांच्या हाती कोणतेही पुरावे सोपवू नये, असे वकिलांनी सुचवले आहे.
या खटल्यात २००७ पासून बाळासाहेबांवर उपचार करणाऱ्या डॉ. जलील पारकर यांचा जबाब न्यायालयाने नोंदवला आहे. उच्च न्यायालय ३० जून रोजी शिवसेना नेते अनिल परब यांचा जबाब नोंदवणार आहे. १३ डिसेंबर २०११ रोजी बनवलेल्या बाळासाहेबांच्या मृत्युपत्रात माझ्या नावावर फार कमी संपत्ती ठेवल्याचा आरोप करत जयदेव ठाकरे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. बाळासाहेबांची प्रकृती स्थिर नसताना उद्धव ठाकरेंच्या दबावामुळे मृत्युपत्रावर बाळासाहेबांची जबरदस्तीने स्वाक्षरी घेतल्याचा दावा जयदेव यांनी केला आहे
बाळासाहेब ठाकरेंची संपत्ती … उद्धव ठाकरे आणि जयदेव ठाकरे वादात तिसऱ्या अनोळखी व्यक्तीमुळे न्यायाधीश टेन्शन मध्ये …
Date:

