पुणे–बालकांमधील मृत्यू व आजारपणाचे प्रमाण कमी करण्यासाठी येत्या एक जानेवारीपासून आणखी चार
लसी मोफत दिल्या जाणार असल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी.नड्डा यांनी शनिवारी येथे दिली.
‘इंद्रधनुष्य अभियाना’ अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या लसीकरणाच्या मोहिमेमुळे लसीकरणाचे प्रमाण
वर्षभरात ५ टक्क्याने वाढले असून तीन वर्षात हे प्रमाण ९० टक्के करण्याचे सरकारचे उद्दिष्ठ
असल्याचेही त्यांनी सांगितले.
‘शारदा शक्ति’ महिलांचे राष्ट्रीय संघटन ही ‘शक्ति’ या राष्ट्रीय संघटनेची पश्चिम महाराष्ट्रातील शाखा
आहे. त्यांच्या वतीने टिळक आयुर्वेद महाविद्यालय व महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे इन्स्टिटयूट ऑफ
हेल्थ सायन्सेस या संस्थांच्या सहकार्याने ‘स्वस्थ नारी – समर्थ भारत’ हे उद्दिष्ट डोळयासमोर ठेवून
आयोजित करण्यात आलेल्या ‘महिला आरोग्यः आव्हाने आणि उपाययोजना’ या विषयावरील दोन दिवसीय
राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन केंद्रिय आरोग्यमंत्री जे.पी.नड्डा यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते.
शनिवार दि. २८ नोव्हेंबर व रविवार दि. २९ नोव्हेंबर २०१५ असे दोन दिवस महाराष्ट्र एज्युकेशन
सोसायटीच्या ‘आबासाहेब गरवारे महाविद्यालय येथे या परिषद आयोजन करण्यात आले आहे., अखिल
भारतीय आर्युविज्ञान संस्थान, नवी दिल्लीच्या डॉ. रमा जयसुंदर ,स्वागत समिती अध्यक्ष डॉ. जयश्री
फिरोदिया, या परिषदेचे स्थानिक पालक डॉ. विजय भटकर, विज्ञान भारतीचे अखिल भारतीय महामंत्री श्री
ए. जयकुमार, शारदा शक्तीच्या राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. सुधाजी तिवारी, राष्ट्रीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष
डॉ. विजय डोईफोडे, सेरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला, बँक ऑफ महाराष्ट्रच्या
सहाय्यक महाव्यवस्थापक (रिकव्हरी) श्रीमती सुखिता भावे, संयोजन समितीच्या अध्यक्षा डॉ. माया
तुळपुळे, सचिव डॉ. लीना बावडेकर हे यावेळी उपस्थित होते. या परिषदेच्या निमित्ताने केलेल्या स्मरणिकेचे
प्रकाशन नड्डा यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले. प्रारंभी दीपप्रज्वलनाने परिषदेचे उद्घाटन जे.पी.नड्डा
यांनी केले. पुणेरी पगडी, शाल, स्मृतीचिन्ह देवून संयोजकांनी त्यांचा सत्कार केला. अखिल भारतीय
आर्युविज्ञान संस्थान, नवी दिल्लीच्या डॉ. रमा जयसुंदर यांचे बीजभाषण झाले. त्यांनी आयुर्वेदाच्या मुळ
संकल्पना स्पष्ट करून वात, पित्त, कफ प्रकृती कशी असते आणि त्याचा एकमेकांशी संपर्क कसा असतो
याबाबत माहिती दिली. भौतिकशास्त्राच्या दृष्टीकोनातून आयुर्वेदाचे महत्व कसे आहे हे त्यांनी यावेळी
सांगितले.
महिला स्वतःच्या कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घेतात, त्यासाठी त्या जागरूक असतात. परंतु महिला
म्हणून स्वतःचे आरोग्यविषयक प्रश्र्न कोणते आहेत, या बाबत त्या जागरूक नसतात. यासाठी महिलांमध्ये
स्वतंच्या आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करावी, हे प्रश्र्न निर्माण होउु नयेत म्हणून कोणती काळजी
घ्यावी, त्यावर कोणते उपाय करावेत या सर्व गोष्टींची माहिती करून देण्यासाठी ही परिषद आय़ोजित
करण्यात आली आहे. आयुर्वेद, अॅलोपॅथी, होमिओपॅथी, फिजिओथेरपी, योग या सर्व विषयांतील तज्ज्ञ मंडळी
संपूर्ण भारतातून या परिषदेमध्ये संवाद साधणार आहेत.
जे.पी.नड्डा म्हणाले, सशक्त भारतासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे. नवजात बालकामध्ये मृत्यू व
आजारपणाचे प्रमाण कमी करण्यासाठी लसीकरण हे प्रभावी मध्यम आहे. ‘इंद्रधनुष्य अभियाना’ अंतर्गत
राबविण्यात येत असलेल्या लसीकरणाच्या माध्यमातून धनुर्वात, घटसर्प, डांग्या खोकला, कावीळ, क्षयरोग,
गोवर, पोलिओ अशा सात आजारांसाठीच्या लसी मोफत दिल्या जातात त्यामध्ये आणखी चार लसींची वाढ
करून आता बालकांना जर्मन गोवर, रुबेला, जापनीज बीईन सेफलायटीस आणि रोटा व्हायरस या चार
लसी येत्या जानेवारीपासून मोफत दिल्या जाणार आहेत.
‘इंद्रधनुष्य अभियाना’ अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या लसीकरणाच्या मोहिमेमुळे लसीकरणाचे प्रमाण
गेल्या वर्षभरात ५ टक्क्याने वाढले असून ते ७० टक्के झाले आहे. तीन वर्षात हे प्रमाण ९० टक्के
करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. पहिल्या टप्प्यामध्ये ५० टक्यांपेक्षा लसीकरण कमी असलेल्या २५०
जिल्ह्यात ही मोहीम राबविण्यात आली आहे. दुसर्या टप्यात आणखी २५० जिल्ह्यात ही मोहीम
राबविण्यात येत असून पहिल्या टप्प्यातील राहिलेल्या ठिकाणीही याबरोबरच लसीकरणाची मोहीम
राबविण्यात येईल. या मोहिमेत लसीकरणापासून पूर्णपणे वंचित राहिलेले किंवा अर्धवट लसीकरण झालेल्या
बालकांचा शोध घेऊन त्यांना लसीकरण करुन त्यांना पूर्ण संरक्षित करण्यात येणार आहे असे नड्डा यांनी
सांगितले.
गरोदर महिलांसाठी ‘मदर अँड चाईल्ड ट्रॅकींग सिस्टीम’ हा उपक्रम राबविण्यात येत असून गरोदरपणात
कुठली काळजी घ्यायची हे त्यामाध्यमातून ‘एसएमएस’द्वारे त्या मातांना कळविले जाते. परंतु अशिक्षित
महिला, गरीब महिलांना हे ‘एसएमएस’ वाचता येत नाहीत त्यामुळे आता हे ‘एसएमएस’ ‘व्हॉईस
एसएमएस’मध्ये परिवर्तीत करून महिलांना ऐकवले जात असल्याने गरोदर महिलांना त्याचा उपयोग होत
आहे. ९ प्रादेशिक भाषांमध्ये ‘व्हॉईस एसएमएस’ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून या
योजनेचा ८ कोटी महिला लाभ घेत असल्याचे त्यांनी सांगितले.
आरोग्याची चांगली काळजी घ्यायची असेल आणि समाजातील तळाच्या व्यक्तीपर्यंत उपचार व स्वास्थ्य
पोहचवायचे असेल तर सर्वसमावेशक औषधोपचाराची संकल्पना विकसित करण्याच्या दृष्टीकोनातून अॉल
इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सच्या देशातील सहा केंद्रांमध्ये ‘आयुष’ चा स्वतंत्र विभाग सुरु
करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या दिवसीय परिषदेच्या मंथनातून स्री आरोग्याच्या बाबतीत ज्या
काही सूचना शासनाकडे येतील त्याचा स्वीकार करून धोरण ठरविताना त्याचा विचार केला जाईल असेही
नड्डा यांनी नमूद केले.
डॉ. विजय भटकर म्हणाले, आता नारीयुग सुरु झाले आहे. इंजिनिअरींग, तंत्रज्ञान, समाजकारण,
राजकारण अशी विविध क्षेत्रे महिलांनी पादाक्रांत केली आहे. त्यामुळे महिलांचे आरोग्य हा महत्वाचा घटक
आहे. कुटुंबामध्ये महिलांच्या आरोग्याबाबत आपण कधी मोकळेपणाने बोलत नाही किंवा चर्चा करत नाही.
महिलांचे २१ व्या शतकातही मानसिक, शारीरिक, सामाजिक शोषण होते ही दुर्दैवाची बाब असून जर
सशक्त भारत करायचा असेल महिला या सर्व दृष्टीने सशक्त होणे गरजेचे आहे.
सुखिता भावे यांनीही आपले मनोगत व्यक्त करून स्रीच्या आरोग्यासाठी मानसिक, शारीरिक
आरोग्याबरोबरच आर्थिक आरोग्य कसे महत्वाचे आहे हे सांगितले.
परिषदेत वैद्यकीय शाखेतील प्राध्यापक व विद्यार्थी शोधनिबंध सादर करतील. वैद्यकीय क्षेत्रातील सर्व
शाखांमधील एकूण १५० जनांनी आपले शोधनिबंध सादर केले आहेत. वैद्यकीय क्षेत्रातील सर्व तसेच काही
संशोधकांनी आपले विषय पोस्टर्सच्या माध्यमातूनही प्रदर्शित केले आहेत. या दोन्ही ठिकाणी उत्कृष्ट
शोधनिबंधांसाठी पारितोषिके दिली जातील. निवडक उत्तम पेपर्स आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिध्द करण्यात
येतील. विद्यार्थ्यांनी विविध विषयावर तयार केलेल्या पोस्टर्सचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे.
या परिषदेच्या ठिकाणी महिला आरोग्यविषयक मार्गदर्शन करणारे प्रदर्शन भरविण्यात आले आहे.
यानिमित्ताने, आस्था संस्थेतर्फे ब्रेस्ट स्क्रिनिंग, शेठ ताराचंद रूग्णालयातील तज्ञ डॉक्टरांकडून आरोग्य
तपासणी करण्यात येत आहे. तसेच टिळक आयुर्वेद महाविद्यालयातर्फे प्रकृती परिक्षण व आहारसल्ला
दिला जाणार आहे. रविवार दि. २९ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ ते ३ या वेळेत ही तपासणी केली जाईल.
याठिकाणी १५ स्टॉल्स उभारण्यात आले असून त्यामध्ये हर्बल मेडिसिन, आयुर्वेदिक मेडिसिनची माहिती व
विक्री केली जात आहे. तसेच वजन कमी करणे, नॉर्मल डिलेव्हरी याबाबत माहिती देणारे स्टॉल्स आहेत.
डॉ. माया तुळपुळे यांनी या परिषदेमागील हेतू स्पष्ट केला. डॉ.लीना बावडेकर यांनी शारदा शक्ती या
संस्थेबद्दल माहिती दिली.
डॉ. राजश्री कशाळकर यांनी आभार मानले.


