छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाची छाप उमटवून अवघ्या महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलेली बालकलाकार ‘मृण्मयी सुपाळ’ आता रुपेरी पडद्यावर झळकण्यास सज्ज झाली आहे .ई टीव्ही मराठीवरील ‘असावा सुंदर चॉकलेटचा बंगला’ मधील ‘ईश्वरी’ आणि ‘तु माझा सांगाती’ या सिरिअलमध्ये ‘आवली’ ची भूमिका साकारणाऱ्या मृण्मयीने अल्पावधीतच आपल्या उत्तम अभिनयाच्या जोरावर रसिक प्रेक्षकांची मने जिंकली. ऋतुराज मोशन पिक्चर्सच्या संदीप राव यांची निर्मिती असलेल्या दिनेश देवळेकर दिग्दर्शित आगामी ‘ब्लॅकबोर्ड’ सिनेमातून मृण्मयी रुपेरी पडद्यावर पदार्पण करणार आहे.
आजच्या या आधुनिक आणि तंत्रज्ञानाच्या युगात शिक्षण महत्वाचे आहे. शिक्षणामुळे माणसाची प्रगती होते आणि त्यातूनच त्याचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होते. आपल्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे ही साहजिकच प्रत्येक पालकाची इच्छा असते आणि यासाठीच समाजातील प्रत्येक स्तरातील व्यक्ती मग ती श्रीमंत असो वा गरीब आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी दिवस रात्र मेहनत करून मुलांना शिक्षण देते. परंतु सध्या या शिक्षण संस्थांचेही बाजारीकरण झाल्याचे चित्र आपल्याला सर्वत्र दिसत आहे. शिक्षण संस्था अँडमिशनसाठी स्वीकारत असलेले डोनेशन, अव्वाच्या सव्वा फीस या सर्वांची पूर्तता करता करता सामान्य वर्गातील माणूस हा पूर्णतः गुरफटून जात आहे.एकंदरीतच शिक्षण संस्थेविरुद्ध असलेला सामान्य माणसाच्या लढ्याची कथा या सिनेमात दाखविण्यात आली आहे.
सिनेमाची कथा-पटकथा दिनेश देवळेकर यांची असून संवाद दिनेश देवळेकर आणि तृप्ती देवळेकर यांनी लिहिले आहेत. मृण्मयी सोबत अभिनेते अरुण नलावडे आणि अभिनेत्री माधवी जुवेकर यांच्या प्रमुख भूमिका असून राजेश भोसले, सुनील होळकर, सायली देवधर, वृषाली हताळकर, चार्ल्स गोम्स, गौरी नवलकर, आदी कलाकारांच्या भूमिका ही आपल्याला या सिनेमात पहायला मिळणार आहेत. सिनेमातील गाणी संदीप पाटील यांनी लिहिली असून संगीतही त्यांचेच आहे. वैभव थोरवे, संदीप पाटील या गायकांच्या सुमधुर आवाजात ही गाणी रेकॉर्ड करण्यात आली असून जावेद अहतीशाम यांनी कॅमेरामन म्हणून काम पहिले आहे.
आता लवकरच हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.