आक्षेपार्ह कृत्य वकिलांनी केला नसल्याचा बार असोसिएशनतर्फे दावा
पुणे – पुणे बार असोसिएशनतर्फे आयोजित “मिस्टर अँड मिसेस‘ या नाटकाचा प्रयोग गोंधळात पार पडला. प्रयोगादरम्यान वकिलांनी आक्षेपार्ह शेरेबाजी केल्याची तक्रार कलाकारांनी केली. तर कोणतेही आक्षेपार्ह कृत्य वकिलांनी केला नसल्याचा दावा अध्यक्ष विकास ढगे पाटील यांनी केला.
शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजता या नाटकाचा प्रयोग आयोजित केला होता. या प्रयोगाविषयी अभिनेता चिन्मय मांडलेकर आणि अभिनेत्री मधुरा वेलणकर यांनी नाराजी आणि वकिलांच्या या वर्तणुकीचा मनस्ताप व्यक्त केला. याबाबत मांडलेकर म्हणाला, ‘प्रयोगाच्या सुरवातीपासूनच वकिलांनी आक्षेपार्ह शेरेबाजी सुरू केली. ही शेरेबाजी करणाऱ्यांना काही जणांनी थांबविण्याचा प्रयत्नही केला. ती न थांबल्यामुळे मध्यंतरापूर्वी आम्ही प्रयोग काही वेळ थांबविला. त्यांना शेरेबाजी न करण्याची विनंती केली. परंतु, प्रयोगाच्या दुसऱ्या अंकातही ती शेवटपर्यंत सुरूच राहिली. वकिलांकडून अशा वर्तनाची अपेक्षा आम्ही केली नव्हती. मध्यंतरात या प्रकाराबद्दल काही वकिलांकडे तक्रार केली होती. या प्रकाराबद्दल संघटनेकडून कोणतीही दिलगिरी व्यक्त केली गेली नाही.‘‘ नाराजी व्यक्त करीत मधुरा म्हणाली ‘आमच्या नाटकाचा हा 151 वा प्रयोग होता. अत्यंत दर्जेदार नाटक असून, अशाप्रकारे वाद निर्माण करून नाटकाला प्रसिद्धी मिळविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा वकिलांचा आरोप चुकीचा आहे. ‘‘