बाबा रामदेव यांना हरियाणाचे ब्रँड अँम्बेसिडर
सोनीपत /पानीपत – योगगुरु बाबा रामदेव यांना हरियाणाचे ब्रँड अँम्बेसिडर करण्यात आले आहे. राज्यात योग आणि आयुर्वेदाला प्रोत्साहन देण्यासाठी हरियाणा सरकारने त्यांना सन्मानित केले आहे. यावेळी त्यांना कॅबिनेट मंत्रिपदाचाही दर्जा दिला जाणार होता, मात्र रामदेव यांनी त्यास नकार दिला. ते म्हणाले, पंतप्रधान आपले आहेत, सरकार आपले आहे, हरियाणाचे मुख्यमंत्री आपले आहेत. मग बाबाला बाबाच राहु द्या, मला कॅबिनेट मंत्रिपद नको आहे. यावेळी मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर, आरोग्य मंत्री अनिल विज, शिक्षण मंत्री रामबिलास शर्मा उपस्थित होते.
सोनीपत येथील राय स्पोर्टस स्कूलमध्ये आयोजित सोहळ्यात बाबा रामदेव यांना सन्मानित करण्यात आले. या सोहळ्याआधी हरियाणा सरकारने बाबा रामदेव यांना मंत्रिपदाचा दर्जा देण्याची घोषणा केली होती. यावरुन विरोधकांनी सरकारवर टीका केली होती. हा वाद चिघळत असल्याचे दिसल्यानंतर रामदेव यांनी कॅबिनेट दर्जा स्विकारण्यास नकार दिला.
रामदवे म्हणाले, की हरियाणामध्ये योगाचा प्रचार करण्यासाठी मी माझ्या स्वतःच्या वाहनाने आणि स्वखर्चाने फिरेल. त्यासोबतच त्यांनी हरियाणाच्या प्रत्येक जिल्ह्यात एक योग केंद्र सुरु करणार असल्याचे सांगितले. सरकारी शाळांमधील पीटी शिक्षक आणि योगाचार्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.
बाबा रामदेव म्हणाले, हरियाणामध्ये पतंजलीपेक्षाही मोठे योगकेंद्र तयार केले जाईल. जे देशातील सर्वात मोठे योगकेंद्र असेल. देशात हर्बल पार्क खूप असतील पण येथे हर्बल वन तयार केले जाईल. या वनात सर्व प्रकारच्या जडी-बुटींची झाडे असतील.येथे संशोधक विद्यार्थ्यांनाही मोठी संधी असेल.