चंद्रपूर : हिमालयासारखी उंची असणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान दिले. या संविधानामुळेच देशात स्वातंत्र्य, समता व बंधूत्वाचा भाव निर्माण झाला. ही बाब भारतीय लोकशाहीला मजबूत करणारीच ठरली नाही तर जगातील सर्वात मोठी समृध्द लोकशाही असणारा देश म्हणून या देशाकडे जगाचे लक्ष गेले. आम्ही ज्या-ज्या ठिकाणी बाबासाहेब होते त्या स्थळांचा राष्ट्रीय स्मारक म्हणून विकास करणार असून या देशात, या महाराष्ट्रात संविधानावर आधारित समतेचं राज्य स्थापन होणार, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर रौप्य महोत्सव समितीच्यावतीने चंद्रपूर येथे आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
याप्रसंगी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार नाना शामकुळे, उपमहापौर वसंत देशमुख, प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, पोलीस अधीक्षक संदीप दिवाण, आर.पी.आय. नेते व्ही. डी. मेश्राम, राजू भगत, प्रवीण खोब्रागडे यांची उपस्थिती होती.
श्री. फडणविस म्हणाले, देशाच्या प्रगतीसाठी संविधानावर आधारित राज्य स्थापन होत असतानाच बाबासाहेबांच्या आठवणी जोपासणे आणि संविधानाची अंमलबजावणी करणे हे आमचे कर्तव्य आहे. या संविधानामुळे देशातील गरीब नागरिक देखील पंतप्रधान होऊ शकतो. ही शक्ती ओळखून आम्ही संविधानाचा स्वीकार केलाचं पाहिजे. आमचे सरकार आल्यानंतर इंदू मिलच्या जागेवर डॉ. आंबेडकरांचे भव्य स्मारक निर्माण करण्याचे कार्य हाती घेण्यांत आले. जपान येथील कोयासान विद्यापिठात बाबासाहेबांचा भव्य पुतळा या सरकारने दिला. लंडन मधील घर खरेदी करण्यात येऊन तेथे बाबासाहेबांची फोटोबायोग्राफी लावण्याचे नियोजन करण्यात आले आहे. बाबासाहेब भारताचे नव्हे तर साऱ्या जगाचे आहेत. त्यांचे व्यक्तीमत्व संपूर्ण विश्वाला दिशा देणारे आहे. त्यामुळे जेथे-जेथे बाबासाहेब होते त्या सर्व भारतातील वास्तु राष्ट्रीय स्मारक करू, अशी घोषणा त्यांनी केली.
यावेळी मुख्यमंत्री, अर्थमंत्री यांनी बाबासाहेबांच्या पुर्णाकती पुतळ्याला पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना वाहिली. सोबतचं कार्यक्रम स्थळी ठेवण्यात आलेल्या बाबासाहेबांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेतले. कार्यक्रमाचे संचालन व आभार व्ही. डी. मेश्राम यांनी केले.
माईंचे गांव होणार ‘आदर्श गाव’
येथील डॉ. आंबेडकर शतकोत्तर रौप्य महोत्सव समितीच्यावतीने चंद्रपुरातील आंबेडकर चौकात 59 व्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून आदरांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, प्रत्येक यशस्वी पुरूषांच्या मागे एक स्त्री असते. महामानव डॉ. आंबेडकरांच्या मागे महामाई रमाबाई आंबेडकर होत्या. त्यांच्या रत्नागिरी जिल्ह्यातील गावाला आदर्श ग्राम बनविण्यासाठी मार्च महिन्यात 2 कोटी रूपये देण्यात येईल.

