नवी दिल्ली
-माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना ‘भारतरत्न’ आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना पद्मविभूषण सन्मान दिल्याबद्दल एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर सडकून टीका केली आहे. मंदिर वही बनायेंगे … घोषणा त्यामुळे आता आठवू लागल्या आहेत . बाबरी मशीद पाडण्याच्या कटात सहभागी असलेल्या अटल-अडवाणींना सर्वोच्च पुरस्कार देणाऱ्या सरकारकडून आम्ही न्यायाची आशा करूच शकत नाही, असा हल्ला त्यांनी चढवून त्यांनी सरकार विरोधात वातावरण पेटवण्याचा प्रयत्न केला आहे.
अयोध्येतील बाबरी मशीद पाडण्यात माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचाही हात आहे. ५ डिसेंबरचं त्यांचं भाषण कार्यकर्त्यांना भडकवणारंच होतं. ‘ज़मीन को समतल करना पडेगा… बैठने लायक बनाना पडेंगा…’ या वाक्यांतून त्यांनी हवा तो संदेश कारसेवकांपर्यंत पोहोचवला होता. त्या भाषणाचा व्हिडिओ आजही यू-ट्युबवर आहे. मग, सरकार ही गोष्ट विसरली का? अशा व्यक्तीला ‘भारतरत्न’ कसा दिला जातो?, असा सवाल असदुद्दीन ओवेसींनी केंद्राला केला आहे.
लालकृष्ण अडवाणींच्या ‘पद्मविभूषण’वरही त्यांनी तीव्र आक्षेप घेतलाय. रथयात्रेच्या माध्यमातून देशभरात हिंसाचार भडकवण्याचं काम अडवाणींनी केलं होतं. आजही त्यांच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. अशा आरोपींना पद्मविभूषणसारखा सन्मान आजवर कधीच दिला गेलेला नाही. पण ते काम या सरकारनं केलंय. त्यांच्याकडून काय अपेक्षा करायची?, असा सणसणीत टोला ओवेसींनी हाणलाय.