पुणे-मागे वळून पाहताना माझ्या या निवड प्रक्रीयेची मला खंत वाटत नाही. मी बंड केले म्हणून मी तरलो, असे मत ज्येष्ठ अभिनेते दिग्दर्शक अमोल पालेकर यांनी व्यक्त केले. आशय फिल्म क्लबतर्फे आयोजित ९ व्या आशियाई चित्रपट महोत्सवात आज ज्येष्ठ अभिनेते दिग्दर्शक अमोल पालेकर यांना यंदाचा ‘झेनिथ एशिया सन्मान’ नवसिनेमाचे प्रणेते कुमार शाहनी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
यावेळी बोलताना अमोल पालेकर म्हणाले की, पारंपारिक चित्रपटांमध्ये स्त्रियांना नेहमी दुय्यम भूमिका दिल्या जातात. मात्र माझ्या चित्रपटांची स्त्री हीच केंद्रीय संकल्पना असायची. स्त्रियांचा परिवारात आणि समाजात मानसन्मान उंचावेल अशाच भूमिका मी स्त्रियांच्याबाबतीत आखत गेलो. कलेला कलेच्या दृष्टीनेच पाहिले पाहिजे. त्यात भावना गुंतवून भावना दुखवला गेल्या, असा दृष्टिकोन ठेवायला नको.
मी प्रेक्षकांना विनंती करतो की ब्लॅक किंवा व्हाईट अशा कथानकात अडकू नये. सध्या सगळीकडे असहिष्णूता दिसून येत आहे. पद्मावत सारख्या चित्रपटाला विरोध होतो. आमिर खानने जर महाभारतात ‘श्रीकृष्णाची भूमिका निभावली तर त्यालाही विरोध होतो. देशातील ही परिस्थीती आहे.
पारंपारिक चित्रपट सृष्टीत रमण्याऐवजी मी प्रादेशिक चित्रपटांमध्ये अधिक रमलो. चित्रपट निवडताना मी संहितेच्या आशयाला महत्त्व दिल्याने मी चित्रपट स्वीकारण्याऐवजी अनेक चित्रपट नाकारतच गेलो. मागे वळून पाहताना माझ्या या निवड प्रक्रीयेची मला खंत वाटत नाही. मी बंड केले म्हणून मी तरलो, असे मत ज्येष्ठ अभिनेते दिग्दर्शक अमोल पालेकर यांनी व्यक्त केले.

