पुणे-फिनिक्स माॅल प्रशासनाने तृतीयपंथी नागरिकाला माॅलमधे प्रवेश नाकारल्याबद्दल वडगाव शेरी राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षाच्या वतीने आज माॅलबाहेर आंदोलन करण्यात आले.
ट्रान्सजेंडर्स या समाजाचाच एक घटक आहेत. त्यांना त्यांचे मुलभूत हक्क मिळालेच पाहिजे. त्यांना सार्वजनिक ठिकाणी देखील प्रवेश नाकारणे ही आधुनिक काळातील ‘लैंगिक अस्पृश्यता’ आहे. यांच्या विरोधातील लढ्यास माझा पाठींबा आहे असे राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी कालच ट्विट केले होते.
या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी कडून आंदोलन करण्यात आले. माॅल प्रशासनाने झालेल्या घटनेबद्दल माफी मागीतल्यानंतर आंदोलन थांबवण्यात आले. वडगाव शेरी मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष नारायण गलांडे, माजी आमदार बापूसाहेब पठारे, नगरसेवक महेंद्र पठारे, भैय्यासाहेब जाधव यांच्यासोबत भीमराव गलांडे, बाबासाहेब गलांडे, सोमनाथ साबळे, मयूर गलांडे, सदाशिव गायकवाड, संजय गलांडे, मायकल मिरपगार, नितीन राठोड, दादा कांबळे, कृष्णा नायर, महेंद्र कांबळे इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.