मुंबई- उंदरा -मांजराचा ; मान पानाचा खेळ ; अफजलखान-निजामशाहीच्या वक्तव्यांचा खेळ मतमोजणीनंतर संपला असून आता सत्ता स्थापनेचा खेळ सुरु झाला आहे शिवसेना -भाजप सत्तेसाठी पुन्हा एकत्र येत आहेत तर नरेंद्र मोदी ‘वन म्यान शो ‘आणि अमित शहा त्याचा उजवा हात असलेली भाजप ने गडकरी यांच्या समर्थकांचाही आवाज बंद केला आहे आता भाजपा शिवसेनेला १४ मंत्रीपदे देण्यास तयार झाल्याचे वृत्त आहे . ४३ मंत्रीपदाचे वाटप दोनास एक या प्रमाणात मंत्रीपदाचे वाटप करण्यात येणार आहे. त्यानुसार भाजपाच्या वाट्याला २८ तर शिवसेनेच्या वाट्याला १४ मंत्रीपदे येण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्रीपद भाजपाकडे राहाणार असून उपमुख्यमंत्रीपदाचा निर्णय अजून झालेला नाही. शिवसेना उपमुख्यमंत्रीपद मागत असली तरी भाजपा नेते त्यासाठी तयार नसल्याचे सांगण्यात येत आहे. अशी माहिती सूत्रांनी येथे दिली
राज्यातील अनेक आमदारांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना मुख्यमंत्री करण्यासाठी फील्डिंग लावल्यामुळे निर्माण झालेली गोंधळाची स्थिती गुरुवारी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी निवळली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार देवेंद्र फडणवीस यांनी गडकरी वाड्यावर जाऊन दिवाळीच्या शुभेच्छा दिल्यानंतर ‘आपण दिल्लीतच खुश असून केंद्र सरकारमध्येच काम करण्यास उत्सुक आहोत’, अशी स्पष्टोक्ती खुद्द गडकरी यांनीच दिली. दरम्यान, शिवसेनेनेही भाजपला पाठिंबा देऊन सत्तेत सहभागी होण्याचे मान्य केल्याने राज्यात भाजप- शिवसेनेचेच सरकार येणार हे स्पष्ट झाले आहे.
फडणवीस हे माझे सहकारी असून दिवाळीनिमित्त ते आपणाला भेटण्यासाठी आले होते, असे गडकरी यांनी या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले. त्याचबरोबर आपण दिल्लीतच खुश असल्याची पुस्तीही त्यांनी जोडली. या भेटीनंतर दोनच तासांनी नागपुरातील विदर्भ विभागीय भाजप कार्यालयात गडकरी व फडणवीस या दोन्ही नेत्यांसह पक्षाचे प्रमुख नेते व पदाधिका-यांची दिवाळीनिमित्त स्नेहमिलन झाले. यावेळी गडकरी व फडणवीस या दोन्ही नेत्यांनी पदाधिका-यांच्या गाठीभेटी घेऊन त्यांच्याशी अनौपचारिक गप्पा केल्या.
भाजपच्या विजयाचा आनंदही साजरा केला. याआधीही गडकरी यांनी दिल्लीत खुश असल्याचे सांगितले होते मात्र आपण राज्याच्या राजकारणात परतायचे की नाही, याचा निर्णय भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने घ्यायचा आहे, पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारण्याची आपली तयारी आहे, अशी जोड दिली होती. पक्षाचे केंद्रीय नेतृत्व मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांना अनुकूल असल्याचे सूत्रांनी सांगितले. २८ तारखेला मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, भाजपला पाठिंबा देण्यास शिवसेनाही तयार झाली आहे. शिवसेना प्रवक्ते अनिल देसाई म्हणाले, एकत्र सत्ता स्थापनेबाबत एकमत झाले असून मंत्रीपदाबाबत अजून आमची चर्चा सुरु झालेली नाही. दिवाळीनंतर रविवारी किंवा सोमवारी याबाबत चर्चा सुरु होईल. कोणताही प्रस्ताव भाजपाला दिलेला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.पंतप्रधानांनी रविवारी आयोजित केलेल्या स्नेहभोजनास शिवसेना गटनेते आणि अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांना उपस्थित राहाण्यास उद्धव ठाकरे यांनी परवानगी दिल्याची माहिती अनिल देसाई यांनी दिली. उद्धव ठाकरेही स्नेहभोजनाला उपस्थित राहण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
भाजपा गृह, अर्थ, सार्वजिनक बांधकाम, पाटबंधारे, ऊर्जा ही महत्वपूर्ण खाती आपल्याकडे ठेवणार असून दुग्धविकास, महिला बाल विकास, आदिवासी अशी मंत्रीपदे शिवसेनेला दिली जातील. उद्धव ठाकरे नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करून याबाबतचा अंतिम निर्णय घेणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले.