प्रेमकथा हा चित्रकर्त्यांना चिरंतन आव्हान देणारा विषय. प्रेमाचे विविध पैलू तपासून, त्याच्या विविध कंगो-यांचा धांडोळा घेण्याचे प्रयत्न वर्षानुवर्षे सुरू आहेत, मात्र तरीही प्रेम दशांगुळे उरतेच. त्यामुळेच प्रेम हा विषय सर्जनशील चित्रकर्त्याला सतत खुणावत असतो. म्हणूनच ‘लग्न पहावं करून’ या आपल्या पहिल्याच दिग्दर्शकीय प्रयत्नानंतर दिग्दर्शक अजय नाईक पुन्हा एकदा प्रेमाचा एक अनवट पैलू शोधू पाहाणारा ‘बावरे प्रेम हे’ हा संगीतमय प्रेमपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाला आहे.
अनन्या शिरोडकर (उर्मिला कानेटकर-कोठारे) आणि नील राजाध्यक्ष (सिद्धार्थ चांदेकर) यांची ही प्रेमकहाणी गोव्याच्या निसर्गरम्य पार्श्वभूमीवर हळुवारपणे उलगडते. प्रेमकथेला असतात तशीच अनपेक्षित वळणे याही कथेला आहेत. सोबत आहे ‘या प्रेमकथेचा शेवट आनंदी होणार की दुःखी’, हा लाखमोलाचा सवाल.
चित्रपटाची कथा अजयचीच असून पटकथा-संवाद चिन्मय केळकर आणि अजय नाईक यांचे आहेत. गोव्याचे सौंदर्य टिपले आहे छायालेखक सलील सहस्त्रबुद्धे यांनी. अजयनेच लिहिलेल्या गाण्यांना स्वरसाज चढवला आहे शंकर महादेवन, शान, बेला शेंडे, हृषिकेश रानडे आणि अपेक्षा दांडेकर यांनी. स्पृहा जोशीनेही यातील एक गीत लिहिले आहे. याशिवाय, ‘मार्गारेट्स थीम’ हा इन्स्ट्रुमेंटल पीस असून त्यात माउथ ऑर्गन, व्हॅायलीन व अॅकॅार्डियन यांचा समावेश आहे. ७२ वर्षांचे किशोर नाईक यांनी हल्ली क्वचित वापरले जाणारे माउथ ऑर्गन वाजवले आहे.
प्रेमकथेला सुमधूर संगीताची साथ असली की ती प्रेमकथा वेगळ्या उंचीवर जाते, अविस्मरणीय ठरते. संगीताची ही बाजू सांभाळली आहे स्वतः दिग्दर्शक अजय नाईक याने. ‘सतरंगी रे’, ‘लग्न पहावं करून’ नंतर तो पुन्हा एकवार संगीतकार म्हणून प्रेक्षकांसमोर येत आहे. मुंबईत अलिकडेच एका शानदार सोहळ्यात चित्रपटातील कलावंत व गायकांच्या उपस्थितीत चित्रपटाच्या संगीताचे अनावरण करण्यात आले.
ट्रायो एंटरटेनमेंट्स प्रस्तुत मैत्री प्रॅाडक्शन्स व शिवतारा एंटरटेनमेंट प्रॅाडक्शन या बॅनर्सअंतर्गत निलेश सिंग, निमेश रमेश देसाई, वीरेंद्र नरहरी चव्हाण, किशोर नाईक व जयदीप येओले यांनी ‘बावरे प्रेम हे’ची निर्मिती केली असून २६ सप्टेंबर रोजी हा चित्रपट राज्यभरात प्रदर्शित होत आहे.