मुंबई – आई रिटायर होतेय, जाऊ बाई जोरात, श्यामची मम्मी, यांसारखी अनेक लोकप्रिय नाटके लिहिणारे प्रसिद्ध नाटकककार, लेखक अशोक पाटोळे यांचे आज (मंगळवार) दीर्घ आजाराने निधन झाले. पाटोळे यांच्या अखेरच्या इच्छेनुसार त्यांचे देहदान करण्यात येणार आहे. या कारणास्तव त्यांचे पार्थिव केईएम रुग्णालयामध्ये नेले जाणार आहे.
पाटोळे यांनी एकांकिका, कथा, कविता, दूरदर्शन मालिका, नाटके अशा अनेकविध प्रकारांत विपुल लेखन केले होते. “आयजीच्या जीवावर बायजी उदार‘ ही 1971 साली त्यांनी लिहिलेली पहिलीवहिली एकांकिका होती. याशिवाय, अधांतर, अध्यात न मध्यात, हद्दपार, हसरतें यासांरख्या यशस्वी दूरदर्शन मालिकांचेही लेखनही त्यांनी केले होते. झोपा आता गुपचूप, प्रा. वाल्मिकी रामायण, हीच तर प्रेमाची गंमत आहे यांसारखी विनोदी नाटके; तसेच मी माझ्या मुलांचा वा आई रिटायर होतेय यांसारख्या हृदयस्पर्शी नाटकांच्या लेखनासहित, पाटोळे यांनी एक चावट संध्याकाळसारख्या वेगळ्या नाट्यप्रयोगाचेही लेखन केले होते. पाटोळे यांचा सातव्या मुलीची सातवी मुलगी हा कथासंग्रह आणि पाटोळ्यांच्या पाचोळ्या हा कवितासंग्रहही प्रसिद्ध आहे. “एक जन्म पुरला नाही,‘ हे आत्मचरित्रही त्यांनी लहिले होते.