प्रसिद्ध डिझायनर कृष्णा मेहतांची आयएनआयएफडीसाठी कार्यशाळा
पुणे : कोथरूड येथील इंटरनैशनल इन्स्टिट्युट ऑफ फ़ैशन डिझाईन ( आयएनआयएफडी) च्या विद्यार्थ्यांसाठी प्रख्यात लाईफस्टाईल डिझायनर कृष्णा मेहता यांची कार्यशाळा नुकतीच झाली. या कार्यशाळेत आयएनआयएफडीच्या उदयोन्मुख फ़ैशन डिझायनरसाठी मेहता यांनी मार्गदर्शन केले व त्यांना या क्षेत्रतिल महत्वाचे पैलू उलगडले.
लैक्मे फ़ैशन वीक आणि फ़ैशन डिझाईन काउन्सिल ऑफ इंडियाच्या सल्लागार समितीवर असलेल्या श्रीमती मेहता या गेल्या २० वर्षापासून कृष्णा मेहता या आपल्या ब्रान्डच्या क्रिटिव्ह डायरेक्टर आहेत. अभिनेत्री दीपिका पादुकोण, सोनक्षी सिन्हा, विद्या बालन, उर्मिला मातोंडकर, झीनत अमान, प्राची देसाई आदींनी त्यांच्या कामाची प्रशंसा केली आहे. मेहता यांनी डिझाईन केलेली वस्त्रे या अभिनेत्रींनी परिधान केली आहेत. आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी मेहता यांना सन्मानित करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रख्यात मिलान फ़ैशन वीकमध्ये त्यांच्या वेशभूषा प्रदर्शित झाल्या होत्या. मेहता आयएनआयएफडीच्या मार्गदर्शक आहेत. या कार्यशाळेत मेहता यांनी विद्यार्थ्यांना डिझायनिंग क्षेत्रातील महत्वाच्या टिप्स दिल्या. या क्षेत्रात काम करताना लक्षात ठेवायच्या महत्वाच्या बाबी त्यांनी स्पष्ट केल्या. डिझाईन इंडस्ट्रीतील बदलांची माहिती देताना त्यांनी सांगितले, कि आधुनिक तंत्रज्ञानामुळे जगभरात इ कॉमर्स वाढला आहे. ग्राहकांच्या गरजा-शैली बदलली असून, अद्यावत फ़ैशनचे ज्ञान व भान ग्राहकांना आहे.
या कार्यशाळेत श्रीमती मेहता यांचे प्रश्नोत्तराचे सत्र झाले. डिझाईन इंडस्ट्रीविषयी माहिती देताना त्यांनी स्वत:चा उद्योग कसा सुरु करावा, फ़ैशन मार्केटिंग आणि व्यवसायातील तपशील त्यांनी खास यांच्या शैलीत विशद केला व या क्षेत्रातील मार्केटिंगचा नवा मार्ग त्यांनी विद्यार्थ्यांपुढे उलगडला. ग्राहकांच्या गरजा समजून घेण्यासाठी सुयोग्य विश्लेषण, दुकानदारांचे विक्री कौशल्य, वर्तणूक कौशल्य व दूरदृष्टीची गरज त्यांनी विशद केली. डिझाईन प्रक्रियेच्या विविध टप्प्यांची माहिती यावेळी विद्यार्थ्यांना देण्यात आली. फ़ैशन क्षेत्रातील विविध प्रवाहांच्या परिणाम आपल्या उत्पादनावर सातत्याने होतो. हे प्रवाह उत्पादनाचे अस्तित्व व त्याच्याशी निगडीत अर्थकारण प्रभावित करत असतात, असेही मेहतायांनी स्पष्ट केले. स्वत:च्या सृजनशीलतेत सातत्य राखण्यासाठी अवलंबवाव्या लागणाऱ्या कार्यपध्दतीबाबतही मेहता यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यशाळेमुळे आयएनआयएफडी च्या विद्यार्थ्यांना प्रदीर्घ अनुभवी मेहता यांच्या ज्ञानाचा लाभ मिळाला. विद्यार्थ्यांना फ़ैशन क्षेत्रातील आगामी प्रवाहांविषयी माहिती मिळण्यासही मदत झाली.