पुणे- नागरी विकासाच्या विभागासमोर वाढत्या नागरीकरणाचे फार मोठे आव्हान आहे. आताची
प्रशासकीय सेवा ही ब्रिटीशकालीन आहे. शहरांच्या वाढत्या नागरीकरणाच्या समस्येबरोबरच,
सांडपाणी, घनकचरा अशी अनेक आव्हाने आहेत. या समस्यांची सोडवणूक करण्याकरीता
प्रशासकीय सेवेत मोठे बदल करणे आवश्यक आहे असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण
यांनी व्यक्त केले.
पुणे महानगरपालिका व उपमहापौर आबा बागुल यांच्या पुढाकाराने बालगंधर्व रंगमंदिर येथे
‘लोकसखा’हा कृतज्ञता सोहळा पार पडला, त्यावेळी ते बोलत होते. १९५२ पासून ते आत्तापर्यंतच्या
पुणे महानगपालीकेत उपमहापौरपद भूषविलेल्या माजी उपमहापौरांचा विशेष सत्कार मानाचा फेटा,
शाल, मानपत्र, व त्यांचे रेखाचित्र प्रदान करून करण्यात आला. जुन्या काळातील उपमहापौर,
हयात नसलेल्यांचे कुटुंबीय याने भरलेले व्यासपीठ, जेष्ठ नेत्यांनी जागविलेल्या आठवणी, प्रत्येक
उपमहापौराने आपल्या कारकिर्दीत केलेले पुण्याच्या विकासाठीचे योगदान अशा आठवणींना उजाळा
यानिमित्ताने दिला गेला आणि काळाच्या पडद्याआड गेलेल्या या माजीमहापौरांना व त्यांच्या
कुटुंबीयांनाही कृत्य-कृत्य झाल्यासारखे वाटले. यावेळी आत्तापर्यंतच्या सर्व उपमहापौरांची थोडक्यात
माहिती देणारी चित्रफित दाखविण्यात आली. माजी उपमहापौर दीपक मानकर यांच्या हस्ते सर्व
माजी उपमहापौरांच्यावतीने आबा बागुल यांचा सत्कार करण्यात आला. तसेच माजी उपमहापौरांची
रेखाचित्र तयार करणाऱ्या अभिनवच्या विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट, जेष्ठ नेते उल्हास पवार, आमदार शरद
रणपिसे, आमदार दीप्ती चवधरी, माजी मंत्री चंद्रकांत छाजेड, माजी आमदार मोहन जोशी,
म्हाडाचे माजी अध्यक्ष अंकुश काकडे, उपमहापौर आबा बागुल, युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉ.
विश्वजित कदम तसेच माजी महापौर व त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, महानगरपालिका हा लोकशाहीचा आत्मा आहे. नगरविकासाचे काम
यामाध्यमातूनच होत असते. विकासाचे नियोजन करणे, अर्थकारण, या सर्व गोष्टी याठिकाणी
केल्या जातात. ही कामे चांगल्या पद्धतीने करण्यासाठी जनता विश्वास टाकते व त्यामुळे
अनेकजन उपमहापौर पदापर्यंत पोहचले आहेत. प्रदूषण, वाहतुकीचे प्रश्न अशा इतरही समस्या
महानगरपालिकेसमोर आहेत. पुणे हे सांस्कृतिक शहर आहे. त्याचप्रमाणे शैक्षणिक व्यापारीकरण
व औद्योगीकरण मोठ्या प्रमाणावर झाले आहे. त्यामुळे मोठी आव्हाने झपाट्याने वाढत आहेत.
त्याचा सामना करण्यासाठी चुका होवू न देणे ही सर्वांची जबाबदारी आहे.
पुण्याच्या विकासात आजपर्यंतच्या सर्व उपमहापौरांनी भर टाकली आहे. प्रत्येक उपमहापौराने
पुणेकरांची व आपापल्या पक्षाची सेवा केली आहे. आताच्या पिढीला आठवण होईल असे काम
केले आहे. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी व पदाला सन्मान देण्यासाठी असा सोहळा
करणे आवश्यक आहे असेही चव्हाण यांनी नमूद केले.
गिरीश बापट म्हणाले, महानगरपालिकेतील राजकारणात रुसवे, फुगवे, मान, अपमान, खुन्नस
अशा सर्व गोष्टी असतात. परंतु त्याही पलीकडे जावून प्रत्येकाने एकमेकांना प्रेम दिले हे पुणे
महानगरपालिकेचे वैशिष्ट्य आहे. पक्षाची भूमिका मांडताना सभागृहात एकमेकांशी भांडत असलो
तरी नंतर कौटुंबिक वातावरण असते हा पुण्याचा सांस्कृतिक ठेवा आहे. राज्यात किंवा देशात
अशा प्रकारचे वातावरण बघयला मिळणार नाही. जास्तीत जास्त चांगले काम करणारा उपमहापौर
म्हणून उदाहरण द्यायचे झाल्यास आबा बागुल यांचेच उदाहरण द्यावे लागेल असे सांगून गिरीश
बापट म्हणाले, आबा बागुल यांनी सर्व माजी उपमहापौरांना एकत्र आणण्याचे कठीण काम केले
आहे. त्यामुळे आजचा हा सोहळा आगळावेगळा सोहळा आहे.
उल्हास पवार यांनी आपल्या भाषणात अनेक महापौरांच्या काळातील किस्से, प्रत्येकाच्या
व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्ये, त्यांची काम करण्याची हातोटी याच्या आठवनींना उजाळा दिला.
डॉ. सतीश देसाई यांनी आपले मनोगत व्यक्त करताना, पुण्याच्या सार्वजनिक इतिहासात अशा
प्रकारचा हा पहिला कार्यक्रम असल्याचे सांगून आबा बागुल यांचे कौतुक केले.
दीपक मानकर म्हणाले, उपमहापौर हा केवळ आभार मानण्यासाठी नको. त्याला त्याची भूमिका
स्पष्ट मांडता आली पाहिजे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची निवड ज्या पद्धतीने केली जाते त्या
पद्धतीने दिलेल्या योगदानाची व कार्याची दिशा घेवून महापौर व उपमहापौर पदाची निवड
व्हायला पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले.
आबा बागुल आपल्या स्वागतपर भाषणात म्हणाले, पुण्याच्या विकासात आजपर्यंत ज्या
उपमहापौरांनी योगदान दिले त्यांची उर्जा पुन्हा एकदा एकत्रित करावी हा या सोहळ्यामागचा हेतू
आहे. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती ही पदे जशी घटनात्मक पदे आहेत. तशीच महापौर व उपमहापौर हे
पडे आहेत. दोन्ही पदांना निवडून यावे लागते.त्यामुळे उपमहापौर पदही तितकेच महत्वाचे असून
त्याला अधिकार मिळणे आवश्यक आहे. पुण्यामध्ये पहिले महापौर बाबुराव सणस यांचा पुतळा
आहे. त्याचप्रमाणे पहिले महापौर बापूसाहेब पारगे यांचा पुतळा उभारण्याचा संकल्प आबा बागुल
यांनी यावेळी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधीर गाडगीळ यांनी तर आभार प्रदर्शन माजी नगरसेवक गोपाल तिवारी
यांनी केले.