पुणे – दि कॉन्फडरेशन ऑफ दि रियल इस्टेट डेव्हलपर्स क्रेडाई-महाराष्ट्र, या संघटनेच्या अध्यक्षपदी नागपूरचे बांधकाम व्यावसायिक प्रशांत सरोदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. हॉटेल वेस्टइन, पुणे येथे काल झालेल्या संघटनेच्या सर्वसाधारण सभेच्या बैठकीत ही निवड करण्यात आली. क्रेडाई महाराष्ट्रच्या सर्वसभासदांनी एकमताने सरोदे यांच्या नावाला सहमती दिली. क्रेडाई महाराष्ट्रचे मावळते अध्यक्ष अनंत राजेगांवकर आणि ‘क्रेडाई’चे राष्ट्रीय उपाध्यक्ष सतीश मगर यांनी सरोदे यांच्या नावाची घोषणा सभेत केली.
२०१५ -१७ या कालावधीसाठी संघटनेच्या अन्य पदाधिकाऱ्यांची आणि ५ उपाध्यक्षांची नावेही जाहीर करण्यात आली. वरिष्ठ उपाध्यक्षपदी – शांतीलाल कटारिया (पुणे) आणि उपाध्यक्षपदी राजीव पारेख (कोल्हापूर) , प्रमोद खैरनार (औरंगाबाद), सुनील भायभंग (नाशिक) आणि शैलेश वानखेडे (अमरावती) निवड करण्यात आली. नागपूर येथील महेश साधवानी यांची संघटनेच्या मानद सचिवपदी तर पुण्याचे अनुज भंडारी यांची मानद खजिनदारपदी आणि राजेश गांधी(सोलापूर),रसिक चव्हाण(नवी मुंबई), महिंद्र जैन(रत्नागिरी) यांची संघटनेच्या सहसचिवपदी निवड करण्यात आली.
क्रेडाई महाराष्ट्र ही संपूर्ण महाराष्ट्रातील ३९ शहर शाखा असलेली शिखरसंस्था असून तिचे २६०० हून अधिक बांधकाम व्यावसायिक सभासद आहेत. या शिखरसंस्थेत दर दोन वर्षानी नवीन अध्यक्षाची निवड केली जाते. बांधकाम क्षेत्राला भेडसावणारे प्रश्न सरकारपर्यंत पोहोचवणाचे आणि त्यातून मार्ग काढण्याचे काम अनेक वर्ष ही संस्था करीत आहे.