मुंबई
– राज ठाकरेंचे विश्वासू व मनसेचे सरचिटणीस प्रविण दरेकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा आज मनसेप्रमुखांकडे सोपवला. दरेकर यांचा मुंबईतील मागाठाणे विधानसभा मतदारसंघातून पराभव झाला आहे. आमदरांनी कामे न केल्यामुळे आमच्या आमदरांचा पराभव झाला असे वक्तव्य बाळा नांदगावकर यांनी केल्याने दरेकर नाराज झाले आहेत. त्यामुळे त्यांनी मनसेचा राजीनामा दिल्याचे पुढे येत आहे. राज ठाकरे यांची आज दुपारी भेट घेऊन दरेकर यांनी राजीनामा दिला आहे. मात्र, राज ठाकरेंनी तो स्वीकारला की नाही याबाबत माहिती पुढे आली नाही. दरेकर यांचा राजीनामा राज स्वीकारणार का याकडे लक्ष लागले आहे. मनसेच्या पराभवाबाबत राज यांनी अद्याप मौन सोडलेले नाही.
विधानसभा निवडणुकीतील पराभवाचे विश्लेषण करण्याकरिता राज ठाकरे यांनी मनसेच्या नेत्यांची बैठक कृष्णकुंज निवासस्थानी मंगळवारी बोलावली होती. या बैठकीत विश्लेषण पूर्ण चर्चा झाली चर्चेतील सूर वेगळाच जाणवल्याने नाराज झालेल्या प्रविण दरेकर यांनी राजीनाम्याची घोषणा केली होती. अखेर आज त्यांनी राज यांच्याकडे राजीनामा सुपूर्त केला.
२००९ साली दरेकर यांनी मागाठाणे येथून निवडणूक जिंकली होती. यंदा मात्र तेथे त्यांचा शिवसेनेच्या प्रकाश सुर्वे यांनी पराभव केला. दरेकर यंदा तिस-या स्थानावर फेकले गेले. दोन नंबरवर भाजपचे हेमेंद्र मेहता राहिले. त्यामुळे दरेकर निराश झाले आहेत. राज ठाकरेंचे अतिशय विश्वासू असलेल्या दरेकरांना दारूण झालेला पराभव जिव्हारी लागला आहे. मात्र, पक्षातंर्गत वादही राजीनाम्यामागे असल्याचे कळते.