मुंबई –
महाराष्ट्र विधानसभेतील २८८ नवनिर्वाचित आमदारांपैकी तब्बल १६५ जणांवर वेगवेगळे गुन्हे दाखल असून त्यातील ११५ आमदारांवर चक्क हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी, दरोडा व अपहणाचाही ठपका आहे, अशी धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
‘असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स’ या संस्थेच्या अहवालातून ही माहिती उघड झाली आहे. पक्षनिहाय आकडेवारी पाहिल्यास ‘पार्टी विथ डिफरन्स’ म्हणविणारा भाजप गुन्हे दाखल असलेल्या आमदारांच्या यादीत आघाडीवर आहे. भाजपच्या १२२ आमदारांपैकी ४६जणांवर गुन्ह्यांची नोंद आहे. तर शिवसेनेच्या ६३ पैकी ३५ आमदारांवर गुन्हे दाखल आहेत. संख्येच्या बाबतीत भाजप पुढे असला तरी गुन्हे दाखल असलेल्या आमदारांच्या टक्केवारीत शिवसेना पुढे आहे. शिवसेनेमध्ये सर्वाधिक ५६ टक्के आमदार ज्य्च्यावर गुन्हे दाखल आहेत. राष्ट्रवादीचे ४४ टक्के तर काँग्रेसच्या २४ टक्के आमदारांवर गुन्हे दाखल आहेत.
नवनिर्वाचित २८८ आमदारांच्या आर्थिक, शैक्षणिक आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीचा अभ्यास करून ‘असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स’ या संस्थेने हा अहवाल सादर केला आहे. २००९च्या तुलनेत गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या आमदारांचा टक्का वाढल्याचं चित्र आहे.