विरोधी पक्ष नेते निलेश निकम यांचे आयुक्तांना साकडे
पुणे- चतु:श्रृंगी टेकडीवरून पाषाण रोडच्या दिशेने येणारा आणि पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालय यांच्या जागेतून बाणेर रोडच्या मुख्य नाल्याला मिळणारा नैसर्गिक प्रवाह हा नाला बुजवून रोखण्यात आल्याने पावसाळ्यात पाण्याचा नैसर्गिक प्रवाह पुन्हा एकदा अस्त्यावस्त पसरून ,नागरी वस्त्यांना धोका निर्माण करू शकणार आहे. मुख्य बाब म्हणजे ज्यांनी नदी नाल्याचे रक्षण करायचे त्यांनीच हा नाला बुजविल्याने तो बुजविण्यासाठी राबलेल्या शासकीय रक्षकावरच फौजदारी कारवाई करावी असे पत्र महापालिकेतील विरोधीपक्ष नेते निलेश निकम यांनी महापालिका आयुक्त यांना दिले आहे.
या पत्रात निलेश निकम यांनी असे म्हटले आहे कि,’
या संदर्भात धक्कादायक वस्तुस्थिती खालीलप्रमाणे आहे:
१. प्रशासनाची दुटप्पी भूमिका: सप्टेंबर २०२५ मध्ये जेव्हा टेकडीवरील पाणी अभिमानश्री सोसायटी, निलगिरी लेन आणि इंदिरा वसाहत येथील घरांत शिरले होते, तेव्हा महानगरपालिकेच्या ड्रेनेज व बांधकाम विभागाने २३ सप्टेंबर २०२५ रोजी प्रत्यक्ष पाहणी केली होती. त्यानंतर २५ सप्टेंबर २०२५ रोजी हा नाला पूर्णपणे साफ करून पाण्याचा प्रवाह सुरळीत करण्यात आला होता. याचा अर्थ हा नाला अस्तित्वात असल्याचे आणि तो शहराच्या निचरा व्यवस्थेसाठी (Strom Water System) महत्त्वाचा असल्याचे प्रशासनाने मान्य केले होते.
२. सद्यस्थितीतील अतिक्रमण: सद्यस्थितीत त्याच ठिकाणी, पुणे पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या हद्दीत नैसर्गिक नाला पूर्णपणे बुजवून त्यावर अतिक्रमण करून बांधकाम केले जात असल्याचे उघडपणे दिसून येत आहे. विकास आराखड्यात (DP) स्पष्टपणे दर्शवलेला नाला अशा प्रकारे बुजवणे हा केवळ नियमांचा भंग नसून पर्यावरणाशी केलेला खेळ आहे.
३. आगामी पावसाळ्याचा धोका: गेल्या वर्षी नाला साफ केल्यामुळे दिलासा मिळाला होता, मात्र आता तो पुन्हा बुजवला गेल्याने आगामी पावसाळ्यात या परिसरात मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक पाण्याचा प्रवाह अडवल्यामुळे वसाहतींमध्ये पाणी शिरून जीवित व आर्थिक हानी होण्याची दाट शक्यता आहे.या संभाव्य दुर्घटनेला आता सर्वस्वी प्रशासन आणि हे अतिक्रमण करणारे घटक जबाबदार राहतील.
नाला बुजवून आणि त्यावर अतिक्रमण करून सुरू असलेले बांधकाम तातडीने थांबवण्यात यावे.
सप्टेंबर २०२५ मध्ये ज्या स्थितीत नाला साफ करून प्रवाह मोकळा केला होता, त्याच स्थितीत नाला पूर्ववत (Restore) करण्यात यावा.विकास आराखड्यातील (DP) नाल्याचे अस्तित्व मिटवणाऱ्या जबाबदार व्यक्तींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत.
प्रशासनाने यावर तातडीने कारवाई न केल्यास, आम्ही बाधित नागरिकांना सोबत घेऊन तीव्र जनआंदोलन छेडू आणि या बेकायदेशीर कृत्याविरोधात न्यायालयाचे दरवाजे ठोठावू, याची गांभीर्याने नोंद घ्यावी.


