झी चित्र गौरवची गगनभरारी
रविवार २९ मार्चला झी मराठीवर
मराठी चित्रपटसृष्टी आशयविषयदृष्ट्या अधिक संपन्न होत आहे, मराठीमध्ये आता कोटीचा गल्ला ही साधारण बाब झाली आहे, मराठी चित्रपट तांत्रिकदृष्ट्या अधिक सक्षम झाला आहे, मराठीचा प्रेक्षकवर्ग वाढला आहे, मराठीत नवनवीन प्रयोग होत आहेत.. थोडक्यात काय तर मराठी चित्रपटसृष्टी कात टाकतेय.. मराठी चित्रपटसृष्टीबद्दलची ही विधाने आपण सतत ऐकत, वाचत आणि बोलत असतो. या सर्व बदलांना जवळून बघणारा आणि त्या बदलांची दखल घेत चित्रपटसृष्टीतील कलाकार आणि तंत्रज्ञांचा गौरव करणारा सोहळा म्हणजे झी गौरव पुरस्कार. दरवर्षी अत्यंत दिमाखदारपणे पार पडणा-या या सोहळ्याच्या रंगांमध्ये अवघ्या मराठी चित्रपटसृष्टीचं रंगून जाणे ही आता परंपराच बनली आहे. भव्यतेची हीच परंपरा पाळत झी गौरवचा यावर्षीचा सोहळाही यशस्वीपणे पार पडला. विशेष म्हणजे यावर्षीपासून झी गौरवचे चित्रगौरव आणि नाट्यगौरव असे दोन वेगळे सोहळे प्रेक्षकांना बघायला मिळणार आहेत. मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलेला झी चित्र गौरवचा शानदार सोहळा येत्या रविवारी २९ मार्चला सायंकाळी ७ वा. झी मराठीवर प्रसारीत होणार आहे.
मराठी चित्रपटाची गगनभरारी अशी यावर्षीची संकल्पना असलेल्या या पुरस्कार सोहळ्यासाठी खास विमानाची भव्यदिव्य प्रतिकृती मंचावर उभारण्यात आली होती. ‘चला हवा येऊ द्या’ फेम भाऊ कदम, सागर कारंडे, कुशल बद्रिके, श्रेया बुगडे यांच्यासह संदिप पाठक, हेमांगी कवी यांच्या धम्माल स्किट्स, लोकप्रिय नायिकांच्या नृत्याच्या दिलखेचक अदा आणि डॉ. निलेश साबळे व सई ताम्हनकर यांचं खुमासदार सूत्रसंचालन याने कार्यक्रमात जोरदार रंगत आणली.
यावर्षी चित्रगौरवसाठी एकूण ६१ चित्रपटांची एन्ट्री झाली होती. यात प्रामुख्याने ‘लय भारी’, ‘एलिझाबेथ एकादशी’, ‘क्लासमेट्स’, ‘पोश्टर बॉईज’, ‘लोकमान्य – एक युगपुरूष’ या चित्रपटांमध्ये चुरशीची टक्कर होती. आपलं सगळंच लय भारी म्हणत यावर्षी मराठी चित्रपटसृष्टीत दमदार एन्ट्री घेणा-या रितेश देशमुखला ‘लय भारी’ चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला तर ‘लोकमान्य-एक युगपुरूष’ या चित्रपटातील प्रभावी अभिनयासाठी सुबोध भावेला विशेष ज्युरी पुरस्कार देण्यात आला. ‘तिचा उंबरठा’ चित्रपटातील दमदार भूमिकेसाठी तेजस्विनी पंडितने सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा तर ‘किल्ला’ चित्रपटातील संवेदनशिल अभिनयासाठी अमृता सुभाषने विशेष ज्युरी पुरस्कार पटकावला. सर्वोत्कृट चित्रपटासाठी ‘एलिझाबेथ एकादशी’, ‘लय भारी’, ‘लोकमान्य – एक युगपुरूष’, ‘पोश्टर बॉईज’ आणि ‘हॅपी जर्नी’ या चित्रपटांमध्ये चुरस होती यात ‘एलिझाबेथ एकादशी’ ने सरशी घेत बाजी मारली.
यावर्षीच्या चित्रगौरव पुरस्कारात जीवनगौरव पुरस्काराच्या मानकरी ठरल्या ज्येष्ठ गायिका तथा लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण. राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते आणि ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल, एन. चंद्रा ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक कमलाकार सोनटक्के यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. यावेळी सुलोचनाताईंनी प्रेक्षकांच्या विनंतीवरून “फड सांभाळ तु-याला गं आला” ही लावणी त्याच सदाबहार अंदाजात गायली आणि ख-या कलाकाराला वयाचं बंधन नसतं हे दाखवून दिलं. त्यांच्या आवाजाने रोमांचित झालेल्या समस्त प्रेक्षकांनी टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटात त्यांना अभिवादन केले. तत्पूर्वी सुलोचनाबाईंच्या लोकप्रिय लावण्यांवर सोनाली कुलकर्णी, भार्गवी चिर्मुले, मानसी नाईक, पूजा सावंत आणि स्मिता तांबे यांनी बहारदार नृत्यही सादर केलं.
कार्यक्रमात कलाकारांच्या नियोजीत परफॉर्मन्ससोबतच काही सरप्राइज परफॉर्मन्सही प्रेक्षकांना बघायला मिळतील ज्यात दिग्दर्शक संजय जाधव आणि रवी जाधव यांचं ‘शिट्टी वाजली’ गाण्यावरचं धम्माल नृत्य, महाराष्ट्राचे लाडके भावोजी आदेश बांदेकर यांनी त्यांच्या पत्नी सुचित्रा बांदेकरसोबत खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली या गाण्यावर धरलेला ठेकाही प्रेक्षकांना आवडेल.
एकंदरीत गाणी, नृत्य, धम्माल विनोद आणि पुरस्कार स्वीकारतानाचे काही हळवे क्षण असा मनोरंजनाचा पुरेपूर मसाला असलेला झी चित्र गौरवचा सोहळा येत्या रविवारी सायंकाळी ७ वा. झी मराठीवरून प्रसारीत होणार आहे.