पुष्परचना कार्यशाळेस महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
पुणे: फुले, पाने, छोट्या डहाळया आदींच्या सहाय्याने केलेली आकर्षक
पुष्परचना पद्धत ‘इकेबाना’ च्या पुष्परचनाशास्त्राच्या प्रमाणित प्रशिक्षक सरोज
जोशी यांनी ‘ज्योती कुलकर्णी रिसर्च फाउंडेशन’ तर्फे आयोजित कार्यशाळेमध्ये
महिलांना शिकविले. यामध्ये ग्लेडीओला, जर्बेरा, एस्टर, ऑर्किड ही फुले व तसेच काही
पानांचा उपयोग करून घरगुती पद्धतीने किती आकर्षक पुष्परचना करता येईल हे
शिकविण्यात आले.
पिन होल्डर, फ्लोरल फोम, जाळी तसेच कॉफीचा मग, उभा फ्लॉवर पॉट, पसरट
काचेचे भांडे या घरगुती सामग्रीं वापरून तांत्रिकपद्धतीने त्याचा उपयोग
पुष्परचनेसाठी कसा करता येतो हे या कार्यशाळेमध्ये शिकविले. तसेच पाणी हे
फुलांचे जीवन असल्याचेही या कार्यशाळेत सांगण्यात आले. ‘इकेबाना’ ही जपानी
पुष्परचना पद्धत गेल्या ६०० वर्षांपासून प्रचलित आहे तसेच ती निसर्गाच्या अत्यंत
जवळ आहे असे प्रशिक्षक सरोज जोशी यांनी त्यावेळी सांगितले. यापद्धतीमध्ये
फुलांच्या रंगसंगतीचा तसेच पानांचा अधिक उपयोग कसा गेला जाऊ शकतो हेच
महत्वाचे असते आणि पुष्परचना ही कला आपल्याकडे जपान आणि युरोप मधून
आली.असेही यावेळी त्या म्हणाल्या.
“सध्या सणासुदीच्या दिवसांमध्ये फुलांची आवक चांगली असते. तसेच महिलांना
शास्त्रीय पद्धतीने शिकविण्यात आलेल्या पुष्परचनेचा नक्कीच फायदा होईल”, असे
मत ‘ज्योती कुलकर्णी रिसर्च फाउंडेशन’च्या विश्वस्त अश्विनी देशपांडे यांनी व्यक्त
केले.
‘ज्योती कुलकर्णी रिसर्च फाउंडेशन’ हे महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी सतत
कार्यरत असते. तसेच या फाउंडेशन तर्फे महिलांना उपयोगी पडेल असे अनेक
कार्यक्रमांचे आयोजनही केले जाते.