पुणे, दि. 7 – पुणे शहराला येत्या सोमवारपासून ( सात सप्टेंबर) एक दिवसाने(दिवसा आड) पाणी पुरवठा करण्याचा निर्णय आज घेण्यात आला. पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली महानगरपालिकेत झालेल्या बैठकीतहा निर्णय घेण्यात आला.
पावसाने दिलेली ओढ आणि पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठा याचा आढावा घेता पुण्याच्या पाणी पुरवठ्यात कपात करण्याबाबत निर्णय घेण्यासाठी आजची बैठक घेण्यात आली. या बैठीस महापौर दत्तात्रय धनकवडे, उपमहापौर आबा बागूल, आयुक्त कुणाल कुमार, जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्याबरोबरच सर्वपक्षीय गटनेते उपस्थित होते.
बैठकीत पुण्यास पुरवठा करणाऱ्या धरणातील साठा आणि त्याअनुषंगाने करावयाचे नियोजन याबाबत महापालिका आणि जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली. त्यानुसार पुण्यात एकदिवसाआड पाणी पुरवठा केला तर सध्या उपलब्ध असणाऱ्या साठ्यात पुढील जुलैपर्यंतचे नियोजन करता येणे शक्य होईल. यामध्ये परतीचा पाऊस पडण्याची शक्यताही गृहीत धरण्यात आल्याचेही सांगण्यात आले. टंचाईच्या स्थितीत केवळ पुण्याचाच नाही तर खालील भागातील गावांचाही पाणीपुरवठ्याचा विचार करावा लागेल. कारण पुरंदर आणि दौंड तालुक्यातील काही गावांतील पाणीपुरवठा योजनाया पाण्यावर अवलंबून आहेत. त्यांचाही विचार करावा लागेल, असे सांगण्यात आले. यावर पालकमंत्री गिरीश बापट यांनी एकदिवसाआड पाणी पुरवठा केला जावा असे सांगितले. त्यास सर्वपक्षीय गटनेत्यांनी मान्यता दिली. ही कपात सुमारे तीस टक्के आहे.
एक दिवसाने पाणी पुरवठा करताना त्याबाबतचे वेळापत्रक महापालिका प्रशासनाने तयार करावे. वेळापत्रकाची माहिती पुणेकरांना नीट होईल याची काळजी घ्यावी. बांधाकामासाठी पिण्याचे पाणी वापरले जात असेल तर अशा ठिकाणची कनेक्शन तोडण्याची कारवाई करावी, अशा सूचना पालकमंत्री बापट यांनी दिल्या.
एकदिवसाआड पाणी आल्यामुळे पुणेकर नागरिक पाणी साठवून ठेवणार. त्यामुळे डेंग्यूचा प्रादुर्भाव होऊ शकतो. असे होऊ नये यासाठी महापालिका प्रशासनाने काळजी घ्यावी. त्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशा सूचनाही पालकमंत्री बापट यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी सांगितले की, पाण्याचा गैरवापर टाळला जावा यासाठी महसूल प्रशासन आणि जलसंपदा विभागांची संयुक्त भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. या पथकांनी जिल्ह्यात कारवाई सुरू केली आहे. पुणे शहरातही पाण्याचा गैरवापर टाळण्यासाठी आवश्यक ती कायदेशीर कार्यवाही करता येणे शक्य आहे. तसा आदेशही काढण्याची तयारी आहे. त्यासाठी महापालिका प्रशासनाने एक प्रस्ताव द्यावा, असे सांगितले.
बैठकीस स्थायी समितीच्या अध्यक्षा मनिषा कदम, अरविंद शिंदे, गणेश बीडकर, राजेंद्र वागस्कर, बंडू केमसे, हरणावळ, त्याचबरोबर जलसंपदा विभागाचे अतुल कपोले, खडकवासला प्रकल्पाचे अभियंता लोहार आदी उपस्थित होते.
महापालिकेने जाहीर केले पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक