पुणे, पुण्यात न विकल्या गेलेल्या घरांची संख्या तब्बल ९०७९९ इतकी झाली आहे.न विकल्या गेलेल्या घरां चे मूल्य तब्बल ४८५२६ कोटी रुपये इतके आहे गेल्या वर्षी जून महिन्यात न विकल्या गेलेल्या घराची विकसकाकडील संख्या ६६३५० इतकी होती. त्यात आता ३६ टक्क्यांची भर पडली आहे सरकारने ही घरे विकली जावीत यासाठी करकपातीची काही योजना जाहीर केली तर या घराच्या विक्रीतून सरकारलाहि सुमारे ३००० कोटी रुपयाचा महसूल मिळू शकतो, असे येथील बांधकाम व्यावसायिक रोहित गेरा यांनी म्हटले आहे
गेराज् पुणे प्रॉपर्टी अहवालात सध्या पुण्यातील घराच्या किमती तुलनने कमी असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला असून सध्या घरे घेण्यासाठी योग्य वेळ असल्याचे म्हटले आहे.जून २०१४ ते जून २०१५ या काळात पुण्यातील घराचे दर केवळ ३.३३ टक्क्यांनी (चलनवाढीच्या दरापेक्षा कमी) वाढले आहेत. त्या अगोदरच्या वर्षी ते १०.०३ टक्क्यांनी वाढले होते. जानेवारी २०१५ ते जून २०१५ याकाळात तर घराचे दर केवळ ०.२७ टक्क्यांनी (म्हणजे चलनवाढीच्या दरापेक्षा फारच कमी ) वाढले आहेत. गेल्या वर्षी या काळात घराचे दर ३.०४ टक्क्यांनी वाढले होते. ही सगळी आकडेवारी पाहिली तर सध्या घर घेणे तुलनेने स्वस्तात पडेल असे गेरा डेव्हलपमेंटस्चे व्यवस्थापकीय संचालक रोहित गेरा यांनी म्हटले. गेल्या वर्षी जून महिन्यात न विकल्या गेलेल्या घराची विकसकाकडील संख्या ६६३५० इतकी होती. त्यात आता ३६ टक्क्यांची भर पडून आता विकसकाकडे न विकल्या गेलेल्या घरांची संख्या तब्बल ९०७९९ इतकी झाली आहे.
त्यामुळे खरेदी करणार्याना जास्त पर्याय उपलब्ध आहेत. तयार परंतु न विकल्या गेलेल्या घराचे मूल्य तब्बल ४८५२६ कोटी रुपये इतके भरते. जर सरकारने ही घरे विकली जावीत यासाठी करकपातीची काही योजना जाहीर केली तर या घराच्या विक्रीतून सरकारला विविध कराच्या स्वरूपात ३००० कोटी रुपयाचा महसूल मिळू शकतो, असे गेरा म्हणाले.
सरकारने रिअल्टी क्षेत्राबाबत काही नियंत्रणे आणायची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे आगामी काळात या नियंत्रणामुळे घराचे दर काही प्रमाणात वाढू शकतात.
अहवालातील माहितीनुसार विकसकांचा कल शहराबाहेर किफायतशीर घरे तयार करण्याचा आहे. त्यामुळे खरेदी करताना ग्राहकांनी विकसक आणि इतर बाबीची तपासणी करून घरे घेण्याची गरज आहे. त्याचबरोबर शहराबाहेर विकसक जास्त प्राणात का घरे तयार करीत आहेत याबद्दल मनपाने विचार करण्याची गरज असल्याचे गेरा म्हणाले. महागडी घरापेक्षा किफायतशीर दरातील घरांच्या निर्मितीचे प्रमाण जास्त आहे.
या अहवालावर क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष शांतीलाल कटारिया म्हणाले की, जरी पुण्यात विकल्या न गेलेल्या घरांची संख्या जास्त असली तरी काळजीचे कारण नाही. कारण दीर्घ पल्ल्यात पुण्याचे रिअॅल्टी क्षेत्र निश्चित नफादायक राहणार आहे. कारण पुणे वाढीव घरे सहज पचवू शकते. नव्या नियंत्रण व्यवस्थेेतील तरतुदीमुळे घरांचे दर वाढतील व त्याचा ग्राहकांनाच त्रास होईल.
एचडीएफसीच्या वरिष्ठ महाव्यवस्थापक सोनल मोदी म्हणाल्या की, इतर शहराच्या तुलनेत पुण्यातील रिअल इस्टेट क्षेत्र परिपक्व आहे. येथे घराच्या दरात मोठ्या प्रमाणात चढउतार होत नाहीत. कारण हे शहर शिक्षण, मॅन्युफॅचरिंग, सेवा क्षेत्राबरोबरच निवृत्त होणार्यासाठी आकर्षक आहे. शिवाय येथे गुंतवणूक म्हणून घेण्यापेक्षा राहण्यासाठी घर घेण्यावर लोकांचा भर असल्यामुळे पडून राहिलेली घरे विकली जातील अशी स्थिती आहे.
रिअल इस्टेट क्षेत्रातील कन्सल्टंट कंपनी जेएलएल(पुणे)चे व्यवस्थापकीय संचालक संजय बजाज म्हणाले की, पुण्यातील रोजगारनिर्मिती केवळ एका क्षेत्रावर अवलंबून नाही. कार्यालय, कारखान्यासाठी जागेची मागणी वाढत आहे. यावर्षी तर विविध क्षेत्रात १ लाख रोजगार निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे घराच्या मागणीत वाढ होत राहणार आहे. त्यांनी गेरा रिअॅल्टी रिपोर्टचे कौतुक केले.