पुणे – शहरातील मानाच्या पाचही गणपतींचे गणपतींचे ढोल ताशांच्या गजरात आणि उत्साहाच्या वातावरणात विसर्जन झाले. डेक्कनच्या पांचाळेश्वर घाटावरील कृत्रिम हौदात या मानाच्या गणपतींचे विसर्जन झाले. पुण्यातील रस्ते रांगोळ्या, फुलांनी अक्षरश: फुलल्या होत्या. चौकाचौकात भाविकांनी गर्दी केली होती.डेक्कनच्या पांचाळेश्वर घाटावर सर्व गणपतींचं विसर्जन झालं. दरम्यान, यापुढे दरवर्षी हौदातच विसर्जन करण्याचा निर्णय केसरीवाडा गणपती मंडळाने घेतला आहे.
मानाच्या गणपतीचीं दिमाखदार सुरवात
ग्रामदैवत असलेल्या मानाच्या पहिल्या श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणपतीची मिरवणूक सकाळी साडेदहा वाजता पालखीतून निघाली. तत्पूर्वी महापौर दत्तात्रेय धनकवडे, खासदार अनिल शिरोळे, पालकमंत्री गिरीश बापट, उपमहापौर आबा बागूल यांच्या हस्ते बाप्पांची आरती करण्यात आली. त्यानंतर मिरवणुकीला प्रारंभ झाला. रमणबाग, शिववर्धन या ढोल-ताशा पथकांनी आणि नगारावादनाने मिरवणुकीत खरी रंगत आणली. त्यात प्रभात बॅंडच्या धूनने आणखीनच आनंदाचे रंग भरले. “सत्यम् शिवम् सुंदरम्‘ आणि “बाप्पा मोरया रे बाप्पा मोरयाऽऽ‘ या गीतांवर अनेकांनी ठेका धरला. कामायनी विद्या मंदिर, आर्ट ऑफ लिव्हिंग, सांगलीतील संभाजी भिडे गुरुजी यांच्या शिवप्रतिष्ठानचे हिंदू धर्मरक्षक पथक आणि दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर “पाणी वाचवा‘चा देखावाही मिरवणुकीत सहभागी झाला होता. मंडळाच्या “श्रीं‘चे दुपारी साडेचारच्या सुमारास नटेश्वर घाटावरील हौदात विसर्जन करण्यात आले.
मानाचा दुसरा गणपती असलेल्या श्री तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या “श्रीं‘ची विसर्जन मिरवणूकही कसबा गणपतीच्या पाठोपाठ वाजत-गाजत टिळक पुतळ्यापासून निघाली. चांदीच्या पालखीत विराजमान झालेली बाप्पांची विलोभनीय मूर्ती सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. याशिवाय, आढाव बंधूंचे नगारावादन, ताल, शिवमुद्रा ढोल पथके आणि न्यू गंधर्व ब्रास बॅंडने मिरवणुकीत रंग भरले. श्रुती मराठे, तेजस्विनी पंडित यांच्यासह इतर मराठी कलावंतांनी ढोल-ताशा वादन करून उत्साह द्विगुणित केला. पारंपरिक वेशभूषेत महिलांबरोबरच अश्वारूढ बालशिवाजी आणि रणरागिनीही आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात साठवून घेण्यासाठी गर्दी झाली होती. दुष्काळामुळे “एक मूठ धान्य दुष्काळग्रस्तांसाठी‘ असे आवाहन करून सामाजिक जाणीवही मंडळाने दाखवून दिली. या मंडळाच्या बाप्पांचे सुमारे पावणेपाचच्या सुमारास विसर्जन करण्यात आले.
मानाचा तिसरा गणपती असलेल्या श्री गुरुजी तालीम मंडळाची मिरवणूक आकर्षक फुलांच्या शिवरथात काढण्यात आली. हा रथ जवळपास 16 फूट उंच आणि 14 फूट रुंद होता. मिरवणुकीत सहभागी झालेला जयंत नगरकर यांचा सनईचौघडा ऐकण्यासाठी चांगलीच गर्दी झाली होती. तसाच प्रतिसाद अश्वराज बॅंड पथक, चेतक स्पोर्टस क्लब, नादब्रह्म, शिवगर्जना हा ढोलताशा पथकांनाही मिळाला. या पथकांच्या तालावर अनेकांची पावले थिरकत होती. लाल फेटा आणि पांढऱ्या रंगाचा झब्बा या वेशात मंडळाचे पदाधिकारी व पथकांचे कार्यकर्ते मिरवणुकीत सहभागी झाले होते. नेहमीप्रमाणे मंडळाने यंदाही गुलालाची मुक्त उधळण करत आणि प्रत्येक चौकात मनसोक्त नाचत मिरवणूक काढली. परिणामी तब्बल सव्वासहा वाजता टिळक चौकातून मार्गस्थ झाल्यानंतर सायंकाळी सातच्या सुमारास “श्रीं‘चे विसर्जन करण्यात आले.
मानाचा चौथा गणपती असलेल्या श्री तुळशीबाग सार्वजनिक गणपती मंडळाच्या “श्रीं‘ची विसर्जन मिरवणूक विविध वाद्यांच्या निनादात आणि फुलांच्या भव्य, आकर्षक रथात निघाली. मिरवणूक लक्ष्मी रस्त्यावर दाखल होताच अनेकांचे लक्ष या मिरवणुकीकडे वळले. लोणकर बंधूंचा नगारा, स्व-रूपवर्धिनी, श्री गजलक्ष्मी, हिंद तरुण मंडळ या ढोल-ताशा पथकांनी रंगत आणली. “सहजयोग आजका महायोग‘ हा देखाव्याबरोबरच पुणे डॉक्टर्स असोसिएशनचा अवयव दान जनजागृती रथ, “स्मार्ट सिटी‘चा रथ यांनीही नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. या रथाच्या माध्यमातून पुणे शहर हे “स्मार्ट सिटी‘मध्ये पहिल्या क्रमांकावर आणायचे आहे, हा संदेश पोचविण्यात आला, तसेच मल्लखांबाची थरारक प्रात्यक्षिकेही विद्यार्थ्यांनी सादर केली. मंडळाच्या गणपतीचे साडेसातच्या सुमारास हौदातील पाण्यात विसर्जन करण्यात आले.
मानाच्या पाचवा गणपतीची अर्थात श्री केसरी-मराठा ट्रस्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या “श्रीं‘ची विसर्जन मिरवणूकही मोठ्या थाटामाटात आणि पारंपरिकता सांभाळत फुलांच्या रथात निघाली. बिडवे बंधूंचा सनई-चौघडा, श्रीराम, शौर्य, शिवमुद्रा ही ढोल पथके मिरवणुकीत सहभागी झाली होती. त्यांच्या कलाविष्काराने मिरवणुकीचा माहोल आणखीनच रंगला. या वेळी इतिहासप्रेमी मंडळांचा “विदेशी कपड्यांची होळी‘ हा देखावाही सादर झाला. लोकमान्य टिळक, वीर सावरकर, क्रांतिरत्न पिंगळे यांच्या वेशभूषेतील विद्यार्थी मिरवणुकीत सहभागी झाले होते, तर प्रयास संस्थेने सामाजिक विषयावरील पथनाट्य सादर केले. सायंकाळी पावणेआठच्या सुमारास बाप्पाचे विसर्जन करण्यात आले. मागील वर्षी मानाच्या पाचही गणपतींचे साडेपाचपर्यंत विसर्जन झाले
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी मंडळ रात्री साडेअकराच्या सुमारास बेलबाग चौकातून मार्गस्थ झाले. पाठोपाठ अखिल मंडई मंडळाचे नगारा पथक चौकात आले. त्यांच्यासमोर असलेल्या नादब्रह्म आणि शिवगर्जना या संस्थांचे ढोल पथकांनी वातावरणात चैतन्य निर्माण केले. उत्साही वातावरणात शारदा-गजाननाच्या “स्वराज्य‘ रथाचे रात्री साडेबारा वाजता बेलबाग चौकात आगमन झाले. त्यानंतर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती विसर्जनासाठी . सोमवारी रात्री १२.४१ वाजता जागेवरुन निघाला . पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे जल्लोषात आणि भक्तिपूर्ण वातावरणात विसर्जन करण्यात आले. त्यानंतर सर्वांचे लक्ष लागलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला सुरूवात झाली.श्रीमंत दगडूशेठ गणेश मंडळाचा विसर्जन रथ ओढण्यासाठी ४ बैल जोडी लावण्यात आल्या आहेत. सोमवारी पहाटे ४ वाजणेच्या सुमारास दगडूशेठ गणपतीचे विसर्जन होणार आहे. दगडूशेठ गणपतीच्या मिरवणुकीला जल्लोषात सुरुवात झाली असून पुणेकरांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. रात्री १२ नंतर डीजेला परवानगी नाकारण्यात आल्याने ढोल-ताशांच्या गजरात बाप्पांचे प्रस्थान होत आहे.