पुणे,- या सुटीचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी मनोरंजनाचे अनेक खेळ असणारी मनोरंजन नगरी व हँडलूम प्रदर्शन पुण्यात डेक्कन जिमखाना परिसरात
कै. बाबा भिडे पुलानजीक नदीपात्र मैदानात सुरू झाले आहे. रॅम्बो इंटरनॅशनलतर्फे आयोजित मनोरंजन नगरी रोज सायं. ५ ते रात्री १० या वेळेत सुरू असून
याचे प्रवेशमूल्य ३० रुपये आहे. यामध्ये विविध प्रकारचे २५ खेळ असून हँडलूम प्रदर्शनात सुमारे ३० स्टॉल्स आहेत. पार्किंगची स्वतंत्र व्यवस्था करण्यात
आली आहे. तीन वर्षांखालील बालकांना मोफत प्रवेश आहे.
या मनोरंजन नगरीत आबालवृद्धांसाठी विविध खेळ आहेत. यात ४० फूट उंचीचे जायंट व्हील, टोरा टोरा, चाँद सितारा, सोलम बॉब, ब्रेक डान्स, ऑक्टोपस,
ड़्रॅगन ट्रेन, जंपिंग नेट, लहान मुलांसाठी सुपर ट्रेन, रेंजर, मॅजिक शो आदी विशेष आकर्षणे आहेत. या सोबतच १०० फूटx१०० फूट आकाराचे आईस वर्ल्ड
हे देखील विशेष आकर्षण आहे. त्यामध्ये डीजे सिस्टीम असून संगीताच्या तालावर आनंद लूटता येईल. या प्रत्येक खेळासाठी स्वतंत्र दर आकारले जातील.
या मनोरंजन नगरीत हँडलूम प्रदर्शनात असणाऱ्या सुमारे ३०-३५ स्टॉल्समध्ये विविध राज्यांतील कलाकारांनी तयार केलेल्या वस्तू उपलब्ध असतील.
यामध्ये दिल्ली, राजस्थान, हरियाणा, हिमाचल प्रदेश, पंजाब, उत्तर प्रदेश, जम्मू-काश्मीर, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, बंगाल आणि महाराष्ट्र आदी
राज्यांतील कलाकारांनी या वस्तू सादर केल्या आहेत. यामध्ये सर्व प्रकारच्या साड्या, ड्रेस मटेरियल, महिलांचे तयार कपडे, बेडशीट्स, चादरी, बॅग्ज,
खेळणी, चप्पल, बांगड्या, मण्यांच्या माळा, कृत्रिम दागिने, गृहोपयोगी वस्तू, प्लास्टिक व काचेच्या वस्तू अशा अनेक वस्तूंची रेलचेल आहे. चोखंदळ
खरेदीसाठी ही मोठी सुवर्णसंधी असणार आहे.
या मनोरंजन नगरीत खाण्याचे विविध स्टॉल्स असून त्यामध्ये पावभाजी, उत्तप्पा, मसाला डोसा, पंजाबी, महाराष्ट्रीयन, दाक्षिणात्य व चायनीज पदार्थांचे
स्टॉल्स आहेत. तसेच आईस्क्रीम व शीतपेये उपलब्ध आहेत.
या मनोरंजन नगरीचा पुण्यात डेक्कन जिमखाना परिसरात ३ जूनपर्यंत मुक्काम आहे.