केंद्रीय वाहतूक मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांना बूट मारण्याचा प्रयत्न एका तरुणाने सोमवारी रात्री पुण्यात केला. कोथरूडमधील प्रचारसभेत घडलेल्या या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्या तरुणाला चोप दिला. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे.ज्या माथेफिरू तरूणाने गडकरींवर बूट उगारला त्याचे नाव भारत कराड (वय- 37, रा. सध्या सुतारदरा, मूळ मराठवाडा) तो वंजारी समाजाचा असून भाजपचाच कार्यकर्ता असल्याचे तपासात पुढे आले आहे
कोथरूड विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार मेधा कुलकर्णी यांच्या प्रचारासाठी शिक्षकनगरच्या मैदानावर गडकरी यांची सभा आयोजिली होती. सव्वानऊच्या सुमारास गडकरी यांचे सभास्थानी आगमन झाले. तेथे अनेकांनी पुष्पवृष्टी करून त्यांचे स्वागत केले. त्यानंतर ते उपस्थितांना अभिवादन करीत व्यासपीठाच्या दिशेने निघाले होते. मोबाईल फोनद्वारे त्यांचे फोटो काढण्यासाठी आणि त्यांच्याशी हस्तांदोलन करण्यासाठी अनेक जण पुढे येत होते. त्यावेळी एक तरुण हातात बूट घेऊन पुढे आला आणि त्याने तो बूट गडकरी यांच्या अंगावर उगारला. त्यावेळी गडकरींच्या बाजूला स्थानिक भाजप नेते होते. त्यामुळे गडकरींना तो बूट लागला नाही. मात्र भाजप नेते संदीप खर्डेकर यांना तो लागला.अचानक झालेला हा प्रकार काही क्षण कोणाच्याच लक्षात आला नाही. मात्र, गडकरी यांचे सुरक्षारक्षक आणि कार्यकर्ते लगेच पुढे आले आणि त्यांनी त्या तरुणास बाजूला घेतले आणि त्याला बेदम चोप दिला. काही वेळाने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. संबंधित माथेफिरू तरूण हा वंजारी समाजाचा असून, त्याने द्वेषातून गडकरींवर बूट उगरल्याचा प्रयत्न केल्याचे पुढे येत आहे