पुणे – पुण्यातील आठ खासदार लोकसभा आणि राज्यसभेत आहेत. त्यांना दरवर्षी पाच कोटी रुपयांचा वार्षिक विकास निधी प्रत्येकास मिळतो. त्यातून प्रत्येकाने एक कोटी रुपये दिले तरी आठ कोटी रुपये जमा होतील. त्यात भर घालून दरवर्षी एक प्रकल्प महापालिका मार्गी लावू शकते, त्यासाठी माझ्या स्वतःपासून सुरवात करण्यास तयार असल्याचे सांगून राष्ट्रवादीचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी यासाठी समन्वयासाठी बापट यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. ‘पुणे शहर विस्तारत आहे. त्यानुसार शहराचे प्रश्नही वाढत आहेत; ते सोडविण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची आवश्यकता आहे. त्यासाठी राजकीय विचारधारा बाजूला ठेवून एकत्र येण्याची आवश्यकता आहे,‘‘ असे ते म्हणाले
शहराच्या ब्रॅंडिंगसाठी महापालिकेने तयार केलेला लोगो, शहराची छायाचित्रांद्वारे माहिती देणारे “कॉफी टेबल‘ पुस्तकाचे प्रकाशन, पुणे दर्शन बस आणि संकेतस्थळाचे उद्घाटन पवार आणि पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते झाले. त्या प्रसंगी ते बोलत होते. महापौर दत्तात्रेय धनकवडे, उपमहापौर आबा बागूल, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शहराध्यक्षा आणि खासदार वंदना चव्हाण आदी या प्रसंगी उपस्थित होते. पवार म्हणाले, ‘प्रत्येक शहराचे वैशिष्ट्य असलेले पुस्तक तयार करण्याची सर्वत्र पद्धत आहे. आपल्याकडे उशीर झाला तरी, ते झाले याबद्दल अभिनंदन करतो. या शहराचा लौकिक मोठा असून, देशाच्या औद्योगिक विकासात येथील ऑटो, आयटी क्षेत्राने मोलाचा वाटा उचलला आहे. अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांचे “बॅक ऑफिसेस‘ शहरात आहेत. शहराचा विस्तार होताना प्रश्नही बदलत आहेत. त्यांची सोडवणूक करण्यासाठी राजकीय एकमत हवे; तसेच केंद्र, राज्य आणि उद्योग क्षेत्राची मदत घ्यायला हवी.‘‘ शहरातील झोपडपट्ट्यांचे प्रमाण वाढत असल्याबद्दल पवार यांनी चिंता व्यक्त करून वास्तवतेचे भान ठेवून निर्णय घेण्याची आवश्यकता आहे, असे मत व्यक्त केले. उद्योजकांना त्यांच्या नफ्यातील काही रक्कम सार्वजनिक सामाजिक जबाबदारीसाठी खर्च करण्याचे बंधन आहे. त्याचाही महापालिकेने उपयोग करून घ्यायला हवा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
शहराच्या ब्रॅंडिंग, कॉफी टेबल पुस्तक, पुणे दर्शन बस आणि संकेतस्थळाची निर्मिती करण्याची पार्श्वभूमी महापौरांनी प्रास्ताविकात विशद केली; तसेच महापालिकेच्या आगामी काळातील उपक्रमांची माहिती दिली. जगभरातील पर्यटकांना समृद्ध पुण्याची माहिती देण्यासाठी हा उपक्रम हाती घेतल्याचे खासदार चव्हाण यांनी सांगितले. त्यासाठी स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विशाल तांबे, बापूराव कर्णे गुरुजी, अरविंद शिंदे; तसेच अन्य पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केल्याचे नमूद केले. आगामी काळात शहर स्वच्छ व सुंदर दिसेल, यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले.
पक्षनेत्यांना डावलणारे राजकारण –
महापालिकेच्या कार्यक्रमास सर्व राजकीय पक्षांच्या गटनेत्यांना बोलविले जाते आणि ते उपस्थितही राहतात, असा संकेत आहे; परंतु या कार्यक्रमाला भाजप, मनसे, शिवसेनेचे गटनेते उपस्थित नव्हते. कॉंग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे सभागृहात उपस्थित असूनही व्यासपीठावर आले नाही. याची दखल पालकमंत्री बापट यांनी त्यांच्या भाषणात घेतली. ते म्हणाले, “”महापालिकेत निवडून आल्यावर प्रत्येक राजकीय पक्षाचे नगरसेवक पूर्वी शहराच्या विकासकामांसाठी एकत्रित काम करायचे. मात्र, गेल्या काही काळात चित्र बदलले आहे. पुण्याच्या प्रश्नांसाठी आमदार विधानसभेत एकत्र येतात. मात्र, सभागृहात नगरसेवक एकत्र दिसत नाहीत, ही दुर्दैवाची बाब आहे. मोठे व्हायचे असेल तर संकुचितपणा सोडला पाहिजे. पुणेकरांचे प्रश्न सोडविले नाहीतर ते पुन्हा निवडून देणार नाहीत.‘‘ पदाचा वापर हा नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी केला पाहिजे, हा सल्ला पालकमंत्री म्हणून नव्हे; तर मित्रत्वाच्या नात्याने आणि पुणेकर म्हणून देत असल्याचे बापट यांनी नमूद केले. याबाबत शिंदे म्हणाले, ‘महापालिकेत गटनेत्यांच्या बैठकीत या कार्यक्रमाबद्दल जे ठरले होते, त्याची अंमलबजावणी झालेली नाही. आमच्या पक्षनेत्यांना बोलविण्यात आलेले नव्हते. त्यामुळे मी व्यासपीठावर गेलो नाही.‘‘