पुणे :
पुण्यातील सारसबाग येथील व्यावसायिकाकडून दोन युवतींस मारहाण प्रकरणामुळे महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. याबाबतची मागणी करणारे निवेदन “पुणे शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस’च्या वतीने खासदार ऍड. वंदना चव्हाण यांनी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांच्याकडे सादर केले.
महिलांच्या सुरक्षिततेसंदर्भात अनेक उपाययोजना करूनही महिला छेडछाडीचे अनेक प्रकार दिवसेंदिवस गंभीर होत चालले असल्याने, आरोपींवर योग्य ती कारवाई लवकरात लवकर करण्यात यावी अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली. निवेदन सादर करतेवेळी शशीकला कुंभार, मनाली भिलारे (संघटक युवती राष्ट्रवादी कॉंग्रेस), श्वेता होनराव, रवी चौधरी, राकेश कामठे (राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस आघाडी शहर अध्यक्ष), मनोज पाचपुते, अभिषेक पळसकर, निखिल बटवाल आदी उपस्थित होते.
“शहरात शिक्षण, नोकरीच्या निमित्ताने अनेक विद्यार्थिनी, महिला काम कीरत असतात. रस्त्यावरील व्यावसायिक, हुल्लडबाज मुलांकडून त्यांना त्रास सहन करावा लागतो. सारसबाग, लक्ष्मीरोड, तुळशीबाग, कॅम्प परीसरात पथारीवाल्यांनी जागा अडवून ठेवल्याने नागरिकांना चालणे देखिल अशक्य झाले आहे. यातून अनेकदा वादावादी, मारामारी असे प्रकार घडत असतात. याचा त्रास अधिकाधिक महिलावर्गास होतो. रस्त्यावरील खाद्यपदार्थांच्या गाड्यांवर काम करणारे युवक प्रामुख्याने परप्रांतातील असतात, त्यांनी एखादा गुन्हा केल्यास त्यांना पकडणे अवघड होते. अशा परिस्थितीत व्यवसाय मालकाने त्यांच्याकडे काम करणाऱ्या कामगारांची माहिती व फोटो असणे बंधनकारकच आहे. शहरातील अशा सर्व जागांवरील अतिक्र्रमणे लवकरात लवकर काढून पादचारी मार्ग आणि वाहनतळाच्या जागा मोकळ्या करण्यात याव्यात’, अशी मागणी निवेदनामार्फत राष्ट्रवादी पक्षाच्यावतीने खा.वंदना चव्हाण यांनी आयुक्तांकडे मांडली.