पुणे शहरात गणेशोत्सवामध्ये ‘डायल 108’ सेवेच्या वतीने 56 रूग्णांना मदतीचा हात
पुणे :
गणेशोत्सवादरम्यान झालेल्या आपत्कालीन आणि गर्दीमुळे जिवावर बेतणार्या प्रसंगातून नागरिकांचे प्राण वाचविण्यासाठी राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने आणि ‘बीव्हीजी इंडिया लिमिटेड’ या सेवा क्षेत्रातील कंपनीच्या माध्यमातून चालविण्यात येणार्या ‘महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिस’(डायल 108) सेवेच्यावतीने गणेशोत्सवामध्ये 56 रूग्णांना मदतीचा हात देण्यात आला. यामध्ये 6 रुग्णवाहिका, रूग्णांपाशी जाऊन तातडीने मदत कार्य करण्यासाठी 10 ‘इमर्जन्सी गो -टीम’ चा समावेश होता, अशी माहिती ‘महाराष्ट्र इमर्जन्सी मेडीकल सर्व्हिस’चे मुख्य संचालन अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर शेळके यांनी दिली.
‘डायल 108’ सेवेद्वारे गणेशोत्सवात एकूण 56 रूग्णांना मदत कार्य करण्यात आले. यामध्ये शहरातील विविध ठिकाणी बेशुद्ध पडणे, रोड अपघातात गंभीर दुखापत, फ्रॅक्चर, हृदयविकार, गर्दीतील प्रसुती वेदना अशा गंभीर आजारांवर आणि इतर आजारांवर आपत्कालीन सेवा देण्यात आल्या. सहाय्यक जिल्हा व्यवस्थापक राहूल गंधाले यांनी नियोजन केले. संतोष शिंदे आणि नानासाहेब ओहाळ यांनी संयोजन केले.
शहरात गणेशोत्सवात देण्यात आलेल्या डायल 108 रूग्णवाहिका सेवेमध्ये पिंपरी चिंचवड येथे 2, मोरगाव, रांजणगाव आणि थेऊर या अष्टविनायक क्षेत्री देखिल प्रत्येकी एक रूग्णवाहिका तैनात करण्यात आल्या होत्या.