पुणे : महावितरणच्या त्रिसुत्री एकदिवसीय कार्यक्रमामध्ये कोथरूड व रास्तापेठ विभागातील सहा लोकवस्तीत गुरुवारी (दि. 17) वीजयंत्रणेच्या दुरुस्तीसह वीजसुरक्षेबाबत केलेल्या उपाययोजनांत 830 कामे तर 10 नवीन वीजजोडणीसह देयकांसंबंधीच्या सेवेची 251 अशी एकूण 1081 कामे एकाच दिवशी पूर्ण करण्यात आली.
कोथरूड विभागातील मयूर कॉलनी शाखेतील केळेवाडी व डहाणूकर शाखेतील मावळे आळी, वडारवस्ती, शाहु कॉलनी, तपोधाम या लोकवस्तीत एकाच दिवशी वीजयंत्रणा दुरुस्ती व वीजसेवेची एकूण 983 कामे करण्यात आली आहेत. यात वीजजोडणीच्या सर्व्हीस वायरची दुरुस्ती, नवीन सर्व्हीस वायर टाकणे, एकाच खांबावरील वीजजोडण्याचे जाळे काढून त्याचे विलगीकरण करणे अशी 678 कामे या भागात करण्यात आली. तर 32 फिडर पिलर्सच्या दुरुस्तीसह नवीन खांब टाकणे, वाकलेले खांब सरळ करणे, रोहित्राची देखभाल व दुरुस्ती, वीजतारांची दुरुस्ती अशी 102 कामे करण्यात आली आहेत. याशिवाय 6 ठिकाणी नवीन वीजजोडणी देण्यात आली तर 53 वीजदेयकांची जागेवरच दुरुस्ती करण्यात आली. सदोष व नादुरुस्त आढळलेले 67 मीटर बदलण्यात आले. डूप्लीकेट देयके देणे, मीटरचे रिंडींग घेणे, मीटर तपासणी आदी 202 कामे दिवसभरात करण्यात आली.
रास्तापेठ विभागातील घोरपडी गावात वीजयंत्रणेच्या तांत्रिक दुरुस्तीचे 50 कामे करण्यात आली. 4 ठिकाणी नवीन वीजजोडणी देण्यात आली. तर नावांत बदल करणे, देयके दुरुस्ती, नवीन वीजजोडणीचे अर्ज स्वीकारणे आदी 48 कामे करण्यात आली.
पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. रामराव मुंडे यांच्यासह अधीक्षक अभियंता श्री. महेंद्ग दिवाकर, श्री. सुंदर लटपटे यांनी विविध ठिकाणी भेटी देऊन वीजसुरक्षेसाठी आवश्यक सूचना केल्या व तांत्रिक दुरुस्तीच्या दर्जाची पाहणी केली. कोथरूड विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. ज्ञानदेव पडळकर, अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री. दत्तात्रय साळी, रमेश लोकरे, सहाय्यक अभियंता गणेश भोसले, मनोज पाटोळे, अतुल देशपांडे यांच्यासह 19 अभियंते, अधिकारी व 105 कर्मचारी त्रिसुत्री कार्यक्रमात सहभागी झाले होते. तर रास्तापेठ विभागातील घोरपडी गाव येथील त्रिसुत्रीमधील विविध कामांसाठी कार्यकारी अभियंता श्री. गणेश एकडे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री. विश्वास देशमुख, दत्तात्रय बानगुडे तसेच सुधन्वा पतकी, श्रीकांत लोथे, राहुल गायकवाड, सतीश ठकार शिवाजीराव लाड आदींसह सुमारे 55 अभियंता व कर्मचारी सहभागी झाले होते.