पुणे (वि.मा.का.): पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीच्या बैठकीत अध्यक्षपदी राजेंद्र ज्ञानदेव माने उर्फ राजा माने यांची आज सर्वानुमते निवड करण्यात आली.
पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीच्या अध्यक्ष निवडीसाठी आज विभागीय माहिती कार्यालय,पुणे येथे बैठक पार पडली. या बैठकीस समितीचे सदस्य सुभाष गजानन भारद्वाज, राजेंद्र ज्ञानदेव माने उर्फ राजा माने, स्वप्नील बापट, विठ्ठल दत्तात्रय जाधव, सचिन घाटपांडे, पुणे विभागाचे उपसंचालक (माहिती) तथा समितीचे सदस्य सचिव यशवंत भंडारे आदी उपस्थित होते.
प्रारंभी श्री. भंडारे यांनी सर्व सदस्यांचे स्वागत केले. बैठकीचे आयोजन अध्यक्ष निवडीसाठी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या प्रसंगी सर्व सदस्यांनी सर्व सहमतीने अध्यक्ष म्हणून राजेंद्र ज्ञानदेव माने उर्फ राजा माने यांची निवड केली. त्यानुसार राजा माने यांची निवड अध्यक्ष म्हणून करण्यात आल्याचे सदस्य सचिवांनी जाहीर केले. श्री. माने हे दैनिक लोकमतच्या सोलापूर आवृत्तीचे संपादक आहेत.
बैठकीनंतर श्री. माने यांचे तसेच समितीच्या सर्व सदस्यांचे श्री. भंडारे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी राज्य अधिस्वीकृती समितीचे सदस्य एस. एम. देशमुख, प्रकाश कुलथे यांच्यासह श्रीनिवास नागे, अशोक पाटील, विनोद कुलकर्णी, सहायक संचालक (माहिती) गो. धों. जगधने तसेच माहिती सहायक सचिन गाढवे उपस्थित होते.