पुणे –
पुणे येथील हज हाऊसचे बांधकाम सुरु करण्याबाबतची मागणी महाराष्ट्र राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री एकनाथ खडसे यांच्याकडे निवेदन देऊन करण्यात आली . हज कमिटी ऑफ इंडियाचे सदस्य हाजी इब्राहीम भाईजान शेख , विधानपरिषद सदस्या हुस्नाबानो खलिफ़े , महाराष्ट्र राज्य हज कमिटीचे सदस्य रियाझ काझी , अड. सलीम शेख , गुलामअली काझी , इसहाक चावीवाले , पुना हज कमिटीचे सचिव गुलाम हैदर सुखी , उपसचिव चिरागुद्दीन नुरुद्दीन आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते .
पुणे येथील कोरेगाव पार्क मधील मौलाना अबुल कलाम आझाद सांस्कृतिक भवन येथे हज हाऊस बांधण्यासाठी भूमिपूजन समारंभ झाला होता . हज हाऊस साठीची जागा पुणे महानगरपालिकेने निश्चित केलेली आहे . मुख्य सभेत त्यास एकमताने मंजुरी दिलेली आहे . तसेच या कामासाठी महापालिकेच्या अर्थसंकल्पात तरतूद देखील करण्यात आली आहे परंतु , न्यायालयाने मनाई हुकुम घेऊन बांधकाम थांबविले . त्यामुळे गेले अनेक वर्षापासून बांधकाम लांबले आहे . आता हा मनाई हुकुम रद्द झाला . पुणे महापालिकेच्या अर्थसंकल्पाततून मिळालेली २५ लाख रुपयांची रक्कम हज हाऊसकरिता वर्ग केली आहे . बांधकाम सुरु करण्यात आले होते . परंतु काही लोकांच्या विनाकारण विरोधामुळे या कामास अडथळे निर्माण झाले . ठेकेदारास आणि त्याच्या कामगारांना शिवागीळ व मारहाण करून काम बंद पाडले .
त्यासाठी आपण वैयक्तिक लक्ष घालून काम त्वरित सुरु करण्याबाबत शासन स्तरावरून आदेश द्यावेत , समाजहित व हज यात्रेकरूना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी करण्यात आली .