राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या वतीने पुणे शहरातील मनपा विकासकामांचा आढावा आणि नियोजन विषयावर कार्यशाळा
पुणे :
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्यावतीने पुणे शहरातील सर्व नगरसेवक आणि पदाधिकारी यांच्यासाठी पुणे मनपा विकासकामांचा आढावा आणि नियोजन विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. ही कार्यशाळा आज दिनांक 12 जानेवारी रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 यावेळेत हॉटेल रॉनदेवू येथे पार पडली.
‘राज्यात आता सत्ता नसली तरी महापालिका, नगरपालिका तसेच जिल्हा परिषदांमध्ये आपली सत्ता अढळ राहावी या उद्देशाने राष्ट्रवादी तयारी करीत आहे. याचाच एक भाग म्हणून राष्ट्रवादीच्याच नगरसेवकांना देण्यात येणारी माहिती ही जनतेपर्यंत पोहचविण्याचा पक्षाचा उद्देश असून आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने ही तयारी सुरू आहे. जाहिरनाम्यात सांगितलेल्या कामांचा उहापोह केला पाहिजे. पुढील दोन वर्षातील कामांचे नियोजन कसे असावे याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले. स्थानिकांना विश्वासात घेऊन सहभागी करून प्रत्येक प्रभागातील कामांची पुर्तता करून पुणे मनपा आदर्श मनपा करू’, असे कार्यशाळेत प्रास्ताविकात बोलताना खासदार अँड़ वंदना चव्हाण म्हणाल्या. तसेच त्यांनी 2017 च्या निवडणुकी तयारीसाठी महापालिकेने राबविलेल्या योजना, समस्या याबाबत माहिती दिली.
कार्यशाळेच्या पहिल्या सत्राच्या सुरूवातीला संजय आवटे यांनी राजकीय सद्यस्थिती, नगरसेवकांच्या प्रतिनीधी म्हणून भूमिका, नवीन पिढीने कशाप्रकारे आपली भूमिका मांडावी याबाबत मार्गदर्शन केले.
डॉ. कीरण शिंदे यांनी पर्यटन व्यवसाय वाढीसाठी पुणे शहराचा विकास कशाप्रकारे करता येईल, इतर शहरांतील पर्यटन व्यवसायाप्रमाणे पुण्यातील पर्यटन व्यवसाय वाढीबाबत मार्गदर्शन केले. संजय कुलकर्णी यांनी पुणे ब्रँडिंग, ब्रँड म्हणजे काय, नगरसेवकांनी याबाबत काय काळजी घ्यावीयाविषयी मार्गदर्शन केले.
शाम ढवळे यांनी पुणे शहरातील पर्यटन विकास आणि शहराचे ब्रँडिंग याबाबत बोलताना हेरिटेज आणि आजची सद्यस्थिती, पुणे शहर आणि हेरिटेज याची योग्य सांगड कशी घालावी याविषयी मार्गदर्शन केले.
पालिकेचे अधिकारी मंगेश दिघे नदी सुधार नदी काठचा परिसर शास्त्ररित्या सुधारणे याविषयी मार्गदर्शन केले आणि आत्तापर्यंत कशाप्रकारे सुधारले याचे सादरीकरण केले. पी.के.दास मुंबईत महत्त्वाच्या ठिकाणी केलेले सौंदर्यीकरण व विकासाचे सादरीकरण केले, नदी सुशोभिकरण इतर देशातील नदी स्वच्छता कार्यशैली, पुण्यातील मुळा-मूठा नदीपात्र सुधार, वॉक-वे प्रकल्प याबाबत माहिती दिली.
पुणे शहरातील विविध समस्यांवर मंथन करण्यात आले त्यामध्ये पुणे महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्यासह अनेक अधिकार्यांनी मार्गदर्शन केले.
महापौर दत्तात्रय धनकवडे, सुभाष जगताप, बापूसाहेब कर्णेगुरूजी, अंकूश काकडे , अशोक राठी, अप्पा रेणूसे, दिलीप बराटे, रवी चौधरी, नंदा लोणकर, मोहनसिंग राजपाल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे पुणे शहरातील सर्व नगरसेवक आणि प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.